भारतीय वंशाच्या अठरा वर्षीय तरूणीने केवळ वीस सेकंदात तुमचा मोबाईल फोन चार्ज होईल अशा अतिजलद यंत्राचा शोध लावला आहे. मोबाईल फोनच्या बॅटरीमध्ये सहज मावू शकणारे हे यंत्र मोबाईलची बॅटरी केवळ २०-३० सेकंदामध्ये चार्ज करते. या शोधासाठी कॅलिफओर्नियातील सारातोगा येथील इषा खरे या तरूणीचा इंटर फाऊंडेशनतर्फे ‘युवा शास्त्रज्ञ पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला आहे. हे अतिजलद यंत्र आपल्या छोटेखानी आकारमानातही प्रचंड ऊर्जा साठवू शकते आणि त्याने चार्ज झालेली बॅटरी दिर्घकाळापर्यंत चालते, असं एनबीसी न्यूजने म्हटले आहे.  
हे यंत्र तयार केल्याबद्दल इषाचा पन्नास हजार डॉलर बक्षिस देऊन गौरव करण्यात आला आहे. एवढंच नव्हे तर गुगलचा महत्वाकांक्षी शोध असलेल्या   ‘गुगल आय’नेही या शोधाचे लक्ष वेधले आहे.
इषाच्या मते, साधारण चार्जर १००० सायकल चालते पण तिने तयार केलेले यंत्र जवळपास १०,००० चार्ज-रिचार्ज सायकल चालते.
या प्रयोगाची प्रेरणा काय होती, असं विचारला असता इषा म्हणाली, ‘माझ्या मोबाईलची बॅटरी नेहमी संपायची, त्यावरील हे उत्तर आहे.’
ह्या सुपर-कॅपॅसिटरमुळे तिला नॅमोकेमिस्ट्री विषयामध्ये अधिक लक्ष घालण्यास मदत होणार आहे. विविध क्षेत्रात नॅनोस्केलमध्ये काम करण्यासाठी याची नक्कीच मदत होईल, अशी तिला आशा आहे.
अद्याप ह्या यंत्राचा प्रयोग फक्त एलईडी लाईटवरच करण्यात आला आहे. पंरतू, मोबाईलसाठीही हे यंत्र काम करू शकते, असे अहवालात म्हटले आहे.
इषाला ह्या यंत्राचा मोबाईल फोनमध्ये वापर करायचा असून प्रवासात सहज नेता येणा-या सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्येही ते लावण्याची तिची इच्छा आहे.
हे यंत्र अतियश फ्लेक्सिबल असून ते कपड्यामध्येही लावता येऊ शकते. तसेच बॅटरीशिवाय यामध्ये आणखी काही वेगवेगळी अॅप्लिकेशन्स आणि त्याचे उपयोगही आहेत, असं इषा पुढे म्हणाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian american teen eesha khare invents wondrous 20 sec charger google eyes bid
First published on: 21-05-2013 at 01:14 IST