भारताची ‘रीसर्च अॅण्ड अॅनालिसीस विंग’ म्हणजेच ‘रॉ’ ही गुप्तचर यंत्रणा पाकिस्तानातील दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा कांगावा आता पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी केला आहे.
पाकिस्तानचा विनाश करण्यासाठीच रॉची निर्मिती झाली असल्याचा आरोप आसिफ यांनी केला आणि त्याकडे दुर्लक्ष करता येणार नसल्याचे म्हटले आहे. इतकेच नव्हे तर तालिबान आणि रॉ यांचे उद्दिष्ट एकच असल्याची दर्पोक्तीही त्यांनी एका दूरचित्रवाणी वाहिनीशी बोलताना केली. बलुचिस्तानातील तथाकथित राष्ट्रवादी नेत्यांकडे भारतीय पारपत्र (पासपोर्ट) असल्याचा दावाही आसिफ यांनी केला. दहशतवादाविरोधातील युद्धाबाबत भारताला पाकिस्तानबाबत खरोखरच सहानुभूती असेल तर भारताने सीमेवर तणाव निर्माण करण्यापासून दूर राहावे, अशी मुक्ताफळेही आसिफ यांनी उधळली आहेत.
पाक लष्कराकडून दखल
भारताची ‘रॉ’ ही गुप्तचर संस्था पाकिस्तानातील अतिरेकी कारवायात सामील असल्याच्या कथित आरोपांची लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी गंभीर दखल घेतली आहे. कोअर कमांडर्स व अधिकाऱ्यांच्या मासिक बैठकीत हा विषय चर्चेला आला होता. बैठकीच्या अध्यक्षस्थानी लष्करप्रमुख राहील शरीफ होते. लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असीम सलीम बाजवा यांनी सांगितले की, भारताची रॉ (रिसर्च अँड अॅनॅलिसिस विंग) ही गुप्तचर संस्था पाकिस्तानातील दहशतवादी कारवायात सामील असल्याच्या आरोपाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. पाकिस्तानी पोलिसांनी आठवडाभरापूर्वी मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंटच्या दोन जणांना अटक केली होती व त्यांना भारतात प्रशिक्षण देण्यात आले होते. अटकेनंतर मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंटचे प्रमुख अल्ताफ हुसेन यांचे भाषण दूरचित्रवाणीवर दाखवण्यात आले होते व त्यात त्यांनी रॉच्या पाठिंब्याची मागणी केली होती व नंतर मात्र माफी मागितली होती. बाजवा यांनी सांगितले की, अंतर्गत व बाह्य़ सुरक्षेचा बैठकीत आढावा घेण्यात आला, त्यात दहशतवादविरोधी मोहिमा सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुन्हेगार, अतिरेकी व शहरी भागात हिंसा पसरवणाऱ्यांवर गुप्तचरांची पाळत असली पाहिजे असे आदेश देण्यात आले आहेत. दहशतवाद मुक्त पाकिस्तान हे आता प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले. पाकिस्तानने ‘झर्ब ए अझ्ब’ ही मोहीम उत्तरेकडे सुरू केली असून त्यात अतिरेक्यांवर कारवाई केली जात आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th May 2015 रोजी प्रकाशित
‘रॉ’ चे दहशतवादाला खतपाणी
भारताची ‘रीसर्च अॅण्ड अॅनालिसीस विंग’ म्हणजेच ‘रॉ’ ही गुप्तचर यंत्रणा पाकिस्तानातील दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा कांगावा आता पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी केला आहे.

First published on: 07-05-2015 at 02:10 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian intelligence agency raw supporting terrorism in pakistan says defense minister khawaja asif