भारतीय वंशाच्या १२ वर्षीय सात्त्विक कर्णिक याने अमेरिकेतील प्रतिष्ठेची भौगोलिक सामान्य ज्ञान स्पर्धा (नॅशनल जिओग्राफिक बी कॉन्टेस्ट) जिंकली आहे. या स्पर्धेवर भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांचे वर्चस्व राहिले. अंतिम फेरीतील १० पैकी ८ भारतीय वंशाचे विद्यार्थी होते. या स्पर्धेत ४० लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पेलिंग स्पर्धेतही भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली.
कर्णिक याने अंतिम फेरीत सर्व पाच प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. त्याचे वडील कर्नाटकमधील असून सॉफ्टवेअर इंजिनीअर आहेत. १३ वर्षीय कोर्नाड ओबीरहूस उपविजेता ठरला. सात्त्विक इयत्ता ७ वीत आहे. तिसरा क्रमांक भारतीय वंशाच्याच ११ वर्षीय संजीव उपालुरी याने पटकावला. सात्त्विकला बक्षीस म्हणून २५ हजार डॉलरची शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच नॅशनल जिऑग्राफिक सोसायटीचे आजीवन सदस्यत्व मिळणार आहे.