आजवर भारतात सत्तेत येणारे प्रत्येक सरकार ‘आम्ही किती कायदे केले’ हे अभिमानाने मिरवत आले आहे. माझे सरकार मात्र कालबाह्य़ झालेले कायदे रद्द करण्याच्या मागे लागले आहे. स्वयंसाक्षांकित करणे, पारपत्र मिळविण्याची पद्धती सुलभ करणे, तंत्रज्ञानाचा कुशल वापर आदींच्या मदतीने मी टाकाऊ आणि प्रगतीला खीळ घालणारे कायदे रद्द करीत आहे, असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी सिडनीतील भारतीयांसमोर गेल्या सहा महिन्यांचे प्रगतिपुस्तक सादर केले.
देशातील गरिबांसाठी राबविलेली जनधन योजना भारतात यशस्वी करण्यासाठी किमान तीन वर्षे तरी लागतील असा रिझव्र्ह बँकेचा अंदाज होता, पण मी १५० दिवसांचे उद्दिष्ट आखून दिले. गेल्या दहा आठवडय़ांत ७ कोटी खाती उघडली गेली. जनता तीच, नोकरशाहीही तीच, योजनाही साधीशीच आणि बँकाही त्याच, पण नेतृत्व खंबीर असेल तर काम वेगाने होऊ शकते हेच यातून अधोरेखित होत असल्याचे मोदी म्हणाले.
दरम्यान, मोदी व ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबट यांच्यात आज, मंगळवारी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होईल. शिक्षा झालेल्या कैद्यांचे हस्तांतरण, सामाजिक सुरक्षा आणि अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील एकत्रित लढा या मुद्दय़ांचा त्यात समावेश असेल.
सरकार नव्हे, तर जनता देश घडवते
सिडनीत भारतीय जनसमुदायासमोर पंतप्रधानांचे भावपूर्ण उद्गार
‘तुम्ही देशासाठी जगू लागलात तर देशाची जनता तुमच्यासाठी मरायलाही तयार असते. मुळात कोणताही देश घडविण्याचे काम सरकार नव्हे तर त्या देशाचे नागरिक करतात. भारतमातेच्या १२५ कोटी सुपुत्रांचे २५० कोटी बाहू हेच या देशाचे खरे बळ आहे,’ अशा शब्दांत भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियात जमलेल्या भारतीय जनसमुदायाशी संवाद साधला. देशात मतदान होत असताना आणि तुमच्या बोटावर शाई उमटण्याची सुतराम शक्यता नसतानाही तुमच्या मनात भारतातील निवडणूक निकालांबद्दल औत्युक्य होते, याचे कारण काय? तर आज तुम्ही जिथे राहता त्या देशासारखा माझा भारत प्रगत आणि विकसित कधी होणार, ही चिंता तुमच्या मनाला लागून राहिली होती, आणि अशी माणसं हीच देशाची ताकद असते, असे सांगत पंतप्रधानांनी सिडनीतील भारतीयांची मने जिंकली.
येथील ऑलफोन्स अरेनावर जमलेल्या २० हजारांहून अधिक भारतीयांशी पंतप्रधान मोदी यांनी सुमारे ४० मिनिटे संवाद साधला. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या पार्लमेंटचे सचिव, न्यू साऊथ वेल्स प्रांताचे राजकीय प्रतिनिधी, अनेक पार्लमेंट सदस्य, क्रिकेट पंच सायमन टॉफेल, जलदगती गोलंदाज ब्रेट ली असे अनेक मान्यवर उपस्थित होते. स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. ‘विश्वगुरू’ होण्याची भारताची क्षमता आहे, असे विवेकानंदांचे वाक्य त्यांनी उद्धृत केले. आणि या विधानावर आपली नितांत श्रद्धा असल्याचे स्पष्ट केले.
गरज विश्वासाची..
देशाचे नेतृत्व करायचे असेल तर देशातील जनतेवर विश्वास टाकणे गरजेचे आहे. आपल्याच माणसांकडे सतत संशयाने पाहण्यापेक्षा सरकार माझेच आहे हा विश्वास, त्यांच्या मनात उत्पन्न केला तर जनताही तुमच्या मागे खंबीरपणे उभी राहते, असे मोदी यांनी सांगितले.
जनधन योजना आणि १५० दिवस
देशातील प्रत्येकाचे बँक खाते सुरू करायचे झाले तर किती दिवस लागतील, या प्रश्नास रिझव्र्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी किमान तीन वर्षे असे उत्तर दिले. वित्त मंत्रालयाने दोन वर्षे, तर पंतप्रधान कार्यालयाने एक वर्ष तरी हवेच असे सांगितले. अखेर मी १५० दिवसांचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट आखून दिले. प्रत्यक्षात गेल्या १० आठवडय़ांत सात कोटी बँक खाती उघडली गेली. तसेच शून्याधारित बँक खाते असतानाही त्यातून ५००० कोटी रुपये उभे राहिले, असा दाखला पंतप्रधानांनी दिला.
प्रवासी भारतीयांसाठी
येत्या ९ जानेवारीला महात्मा गांधी यांच्या भारतात परतण्यास १०० वर्षे होत आहेत. त्यानिमित्ताने भारतीय मूलनिवासी आणि अनिवासी भारतीय नागरिक या संकल्पना विलीन करण्यात येतील आणि कायमस्वरूपी व्हिसा देण्याचा पर्यायही विचाराधीन असेल. भारतीय जनतेइतकाच तुमचाही देशावर अधिकार आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.