भारतीय वन्य संत्र्याची दुर्मिळ प्रजाती (सायट्रस इंडिका) तामेंगलाँग जिल्हय़ात सापडली आहे. ही प्रजाती पृथ्वीतलावरून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

नोक्रेक मेघालयातील गारो टेकडय़ांच्या भागात नोक्रेक जैवावरणात ही प्रजाती सापडली असून, आता तिचे जतन करण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. स्थानिक संशोधकांच्या चमूला वन्य संत्र्याची ही प्रजाती तामेंगलाँग जिल्हय़ात डायलाँग येथे सापडली असून ती सायट्रस प्रकारात मोडते. या झाडाच्या फळांची चित्रे भारतीय पक्षी संवर्धन नेटवर्क चे राज्य समन्वयक आर. के. बीरजित यांच्या नेतृत्वाखालील चमूने घेतली आहेत. यात इम्फाळ महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक ए. खोनाचंद, मोइरांगा महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक एन. सोनी मीटी, वन्यजीव चित्रपट निर्माते के. एच. ब्रजेश व जीवशास्त्रज्ञ गोपेन लैशराम व वाय. नाबा यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे डायलाँग हे जैवविविधता ठिकाण म्हणून यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. जैवविविधता अभ्यास चमूला ५ मे ते ११ मे रोजी अभ्यास करीत असताना वन्य भारतीय संत्र्याची ही प्रजाती सापडली आहे. १९२८-३७ दरम्यान जपानचे कोझाबुरो तनाका यांनी येथील सायट्रस जैवविविधतेचा अभ्यास केला होता तेव्हा त्यांनी सायट्रस फळांच्या अनेक प्रजाती तेथे असल्याचे सांगितले होते. त्यात काही नवीन प्रजातीही होत्या. भारतीय वन्य संत्र्याच्या झाडाला बिरेंगथाय असे म्हटले जाते. ते झाड डायलाँग येथील लोकांना आधीच माहीत आहे. ते प्रथम अहुन पामेई, हिमकामांग गोमेई व खोनाचंद यांनी पाहिले होते, असे बीरजित यांनी सांगितले. डायलाँग खेडे ही एक जिवंत प्रयोगशाळा आहे असे त्यांनी म्हटले आहे.