अमेरिकेतील ‘९११’, इंग्लंडमधील ‘९९९’ या आपत्कालीन संपर्क क्रमांकांच्या धर्तीवर आता आपल्याकडेही सर्व प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत संपर्कासाठी देशभरात एकच क्रमांक निश्चित करण्यात आला आहे. ‘११२’ हाच तो क्रमांक असणार आहे. संपूर्ण देशभरात या एकाच क्रमांकवर संपर्क साधल्यास अडचणीत सापडलेल्या नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध होऊ शकणार आहे. आतापर्यंत आपल्याकडे पोलिसांना संपर्क साधण्यासाठी १००, अग्निशामक दलासाठी १०१, रुग्णवाहिकेसाठी १०२ व १०८ असे वेगवेगळे क्रमांक होते. पण या पुढे ११२ हा एकच आपत्कालीन क्रमांक असणार आहे.
आंतरमंत्रालयीन दूरसंचार समितीने देशभरात एकच आपत्कालीन क्रमांक ठेवण्याला मंजुरी दिली आहे. गेल्यावर्षी एप्रिलमध्ये दूरसंचार नियामक आयोगाने दूरसंचार मंत्रालयाला दिलेल्या एका अहवालामध्ये देशभरात एकच आपत्कालीन क्रमांक ठेवण्याची सूचना केली होती. त्यासाठी ११२ हा क्रमांकही निश्चित करण्यात आला होता. या सेवेमध्ये सुरुवातीला पोलीस, अग्निशामक दल, रुग्णवाहिका, महिलांना सहाय्य, वृद्धांना सहाय्य आणि लहान मुलांसाठी सहाय्य याचा समावेश करण्यात येईल. त्यानंतर टप्याटप्प्याने त्यामध्ये इतर सेवांची वाढ करण्यात येणार आहे.
ही सेवा अधिक उपयुक्त आणि कार्यक्षम करण्यासाठी मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडूनही या क्रमांकाला वेगळे प्राधान्य दिले जाईल. त्याचबरोबर एसएमएसच्या साह्यानेही ही सेवा पुरविण्यात येईल, अशी सूचना करण्यात आली आहे.