येत्या इ.स. २०२८ पर्यंत भारत हा चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनेल त्यावेळी भारताची लोकसंख्या १.४५ अब्जचा टप्पा ओलांडून जाईल. त्यानंतरच्या काळात भारताची लोकसंख्या वाढत राहील व चीनची कमी होत जाईल, असे संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालात म्हटले आहे. जागतिक लोकसंख्येचे भवितव्य या अहवालात म्हटले आहे की, जगाची लोकसंख्या पुढील महिन्यात ७.२ अब्ज होईल व इ.स २१०० पर्यंत ती १०.९ अब्ज होईल.
इ.स. २०५० मध्ये जगाची लोकसंख्या ९.६ अब्ज होईल याचा अर्थ येत्या बारा वर्षांत लोकसंख्या दरवर्षी १० लाखांनी वाढत जाईल, असे संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात म्हटले आहे. ही लोकसंख्यावाढ मुख्यत्वेकरून विकसनशील देशात होईल. आफ्रिकेत ही वाढ निम्म्याहून अधिक असेल. संपूर्ण जगाची लोकसंख्या सध्या ७.२ अब्ज आहे त्यातील वाढ ही कमी झालेली आहे पण आफ्रिका व काही विकसनशील देशात मात्र लोकसंख्या वेगाने वाढत आहे, असे आर्थिक व सामाजिक कामकाज उप महासचिव वू हाँगबो यांनी सांगितले.
जगाची लोकसंख्या भवितव्य-आढावा २०१२ हा अहवाल आज जारी करण्यात आला त्यात असे म्हटले आहे की, २०५० पर्यंत विकसित देशांची लोकसंख्या बदलणार नाही ती १.३ अब्ज राहील. याउलट विकसनशील असलेल्या ४९ कमी विकसित देशांची लोकसंख्या २०१३ मध्ये ९० कोटी आहे ती २०५० मध्ये १.८ अब्ज होईल. पूर्वीच्या लोकसंख्या वाढीचे कल बघता आफ्रिकेतील १५ देशांमध्ये जनन दर जास्त राहणार आहे, तेथे प्रत्येक महिलेमागे मुलांचे प्रमाण हे ५ टक्क्य़ांपेक्षा अधिक असेल. २०५० पर्यंत नायजेरियाची लोकसंख्या अमेरिकेपेक्षा जास्त होईल.
संयुक्त राष्ट्रांच्या आíथक व सामाजिक कामकाज विभागाचे लोकसंख्या संचालक जॉन बिलमोथ यांनी सांगितले की, अलीकडच्या काही वर्षांत जनन दर हा काही देशात अंदाजापेक्षा जास्त राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.
कालांतराने चीन, भारत, इंडोनेशिया, इराण, ब्राझील, दक्षिण आफ्रिका या मोठय़ा विकसनशील देशात प्रत्येक महिलेमागे मुलांची संख्या घटत जाईल तर नायजेरिया, नायगर, काँगो, इथियोपिया व युगांडा या देशात प्रत्येक महिलेमागे होणाऱ्या मुलांची संख्या वाढेल. अफगाणिस्तान व तिमोर-लेस्टे या देशात प्रत्येक महिलेमागे होणाऱ्या मुलांची संख्या पाच पेक्षा जास्त असेल.
माणसाचे आयुर्मानही विकनशील व विकसित देशात वाढत जाईल. २०४५-२०५० दरम्यान ते ७६ वर्षे राहील तर २०९५-२१०० दरम्यान ते ८२ वर्षे राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jun 2013 रोजी प्रकाशित
भारत २०२८ पर्यंत चीनला लोकसंख्येत मागे टाकणार
येत्या इ.स. २०२८ पर्यंत भारत हा चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनेल त्यावेळी भारताची लोकसंख्या १.४५ अब्जचा टप्पा ओलांडून जाईल. त्यानंतरच्या काळात भारताची लोकसंख्या वाढत राहील व चीनची कमी होत जाईल, असे संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालात म्हटले आहे.

First published on: 15-06-2013 at 12:51 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indias population to overtake china by