दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर एका व्यक्तीने शाई फेक केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. पोलिसांनी सिसोदिया यांच्यावर शाई फेकणा-या व्यक्तीला ताब्यात घेतले असून ब्रजेश मिश्रा असे या व्यक्तीचे नाव आहे.

दिल्लीत सध्या चिकनगुनिया आणि डेंग्यूची साथ पसरली असून यामुळे दिल्लीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिल्लीचे शिक्षण मंत्री असलेले मनीष सिसोदिया हे फिनलँडमधील शैक्षणिक पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी १० दिवसांच्या दौ-यावर गेले होते. मात्र या दौ-यावरुन वाद निर्माण झाला होता. दिल्लीत भीषण परिस्थिती असताना मनीष सिसोदिया परदेश दौ-यावर कसे जाऊ शकतात असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. यानंतर दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी मनीष सिसोदिया यांना मायदेशी परतण्याचे आदेश दिले होते. सोमवारी सकाळी मनीष सिसोदिया फिनलँडमधून परतले. फिनलँडमधून परतत असतानाच त्यांनी ट्विटरव्दारे  नजीब जंग यांच्यावर निशाणा साधला होता. जी लोक माझ्या परदेश दौ-याने चिंतातूर झाली होती त्या लोकांनी देशभरातील सरकारी शाळांमधील खालावलेल्या शैक्षणिक दर्जाची चिंता करावी असा चिमटा त्यांनी काढला होता. तसेच पंतप्रधान कार्यालय, गृहमंत्रालय देशभरात सत्तेवर असलेल्या विरोधी पक्षांचे खच्चीकरण करत असल्याचा आरोपही सिसोदिया यांनी केला होता.

भारतात परतल्यावर मनीष सिसोदिया हे नजीब जंग यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेले होते. दुपारी नजीब जंग यांच्या कार्यालयाबाहेर मनीष सिसोदिया यांच्यावर शाई फेकण्यात आली.  मनीष सिसोदिया हे आमच्या पैशांवर परदेशात जातात, पण इथे दिल्लीकरांना त्रास सोसावा लागतो अशी प्रतिक्रिया शाई फेकणा-या ब्रजेश मिश्राने दिली आहे. दिल्लीत चिकनगुनियाने आत्तापर्यंत १५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे दिल्लीचे आरोग्यमंत्र्यांनी मात्र चिकनगुनियाने मृत्यू होत नाही असा दावा केला होता. दिल्लीतील चिकनगुनिया आणि डेंग्यूच्या साथीमुळे दिल्लीत येणा-या पर्यटकांची संख्याही रोडावली आहे. त्यामुळे  दिल्लीकरांमध्ये आरोग्य यंत्रणांविरोधात संताप पसरला आहे.

राजकीय नेत्यांवर शाईफेकीची गेल्या दोन दिवसांतील ही दुसरी घटना आहे.  दोन दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांच्यावरही शाई फेकण्यात आली होती. भोपाळमधील एम्स रुग्णालयातील विद्यार्थ्यांच्या काही प्रलंबित मागण्या होत्या. या मागण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना जे पी नड्डा यांची भेट घ्यायची होती. मात्र भेट मिळत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष खदखदत होता. यातून काही विद्यार्थ्यांनी नड्डा यांच्यावर शाईफेक केली होती.