सरकारच्या निषेध सभेला शंभर श्रोते तर दीडशे सुरक्षारक्षक; जेवणाच्या डब्याचीही तपासणी
चेहऱ्याला फासण्यासाठी शाईचा वापर वाढल्याने दिल्लीच्या ल्यूटन्स झोनमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात श्रोत्यांपेक्षा आता सुरक्षारक्षकांची जास्त संख्या दिसू लागली आहे. कार्यक्रमाला येणारे पत्रकार असोत वा विचारवंत, लेखक कीआणखी कुणी, सर्वाची तपासणी होणार आहे. शिवाय बॅगही दोन-तीनदा तपासली जाणार आहे. अगदी जेवणाच्या डब्यातदेखील शाई, ऑइल पेंट नाही ना, याची खात्री सुरक्षारक्षक करून घेतात. त्यानंतरच कार्यक्रमात प्रवेश मिळतो.
हे ‘शाई’पुराण सुरू झाले मुंबईत, पण त्याचे लोण दिल्लीत पोहचले. केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी दिल्लीच्या प्रेस क्लबमध्ये हिंदी साहित्यिक, कवी, लेखकांनी कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमास उपस्थित होते शंभर जण व प्रेस क्लबला दीडशे सुरक्षारक्षकांचा गराडा होता. या प्रेस क्लबच्या एका बाजूस आहे रेल्वे भवन, तर मागील बाजूस आहे केंद्रीय मंत्रालयांची सामूहिक वास्तू असलेले शास्त्री भवन! दिल्लीत कुठेही कार्यक्रम असला की सुरक्षारक्षक आता शाई, ऑइल पेंटचादेखील शोध घेतात. इतके शाईफेकीचे सावट कार्यक्रमांवर असते.
सोमवारी प्रेस क्लबमध्ये जम्मू-काश्मीरचे आमदार इंजिनीअर रशीद यांना शाई फासण्यात आली. केंद्र सरकारला विरोध दर्शविण्यासाठी गोमांसांची मेजवानी देणाऱ्या इंजिनीअर रशीद यांचा निषेध हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला होता. त्यानंतर मंगळवारी याच प्रेस क्लबमध्ये हिंदी साहित्य वर्तुळातील पाच विविध संस्थांनी एकत्रितपणे निषेध सभेचे दुपारी तीन वाजता आयोजन केले. एरवी प्रेस क्लबमध्ये कुणी ओळखपत्र विचारत नाही. पण सोमवारच्या घटनेचा धसका सुरक्षारक्षकांनी घेतला.
गृह मंत्रालयाच्या आदेशावरून राखीव दलाचे जवान प्रेस क्लबमध्ये दीड वाजल्यापासून दाखल झाले. व्यक्ती-बॅग कशासही वगळले नाही. इलेक्ट्रॉनिक तपासणी केल्यानंतर सुरक्षारक्षक स्वत: डब्यात काही नसल्याची खात्री करून घेत होते. कार्यक्रमात दहा वक्त्यांपैकी सात जणांनी शाईचा उल्लेख केला. या साहित्यिक वक्त्यांमध्ये ज्येष्ठ पत्रकार ओम थन्वी, मॅनेजर पांडे, आशुतोष, विष्णू नागर, निलाभ यांचा समावेश होता.
हा कार्यक्रम जनवादी लेखक संघ, दलित लेखक संघ, प्रगतिशील लेखक संघ तसेच साहित्य संवाद या संस्थांनी आयोजित केला होता. येत्या २३ ऑक्टोबर रोजी हिंदी साहित्यिकांनी काळ्या फिती लावून श्रीराम कला केंद्र ते साहित्य अकादमी निषेध मोर्चा आयोजित केला आहे.

‘तेव्हा संघवाले कुठे होते?’
दै. जनसत्ताचे माजी संपादक थन्वी यांनी केंद्र सरकारवर टीका केली. शीख दंगलीनंतर काही साहित्यिकांनी आपापले पुरस्कार परत केल्याची आठवण त्यांनी सांगितली. जे कधी स्वातंत्र्यासाठी लढले नाहीत त्यांना भारत कसा कळेल, अशा शब्दांत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. ते म्हणाले की, गोहत्या विरोधासाठी वेदांचा दाखला देणाऱ्यांना हिंदू धर्म कळला नाही. साहित्यिक भाजप वा काँग्रेसविरोधी नाहीत. तर ते प्रचलित राजकारणाच्या विरोधात आहेत. पुरस्कार परत करण्याची परंपरा नवी असली तरी तो निषेध व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे, असे त्यांनी सांगितले.