मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या नेतृत्वाखालील हरियाणा सरकारने शनिवारी १३ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या प्रस्तावित 'चलो दिल्ली' मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांतील मोबाइल इंटरनेट, बल्क एसएमएस आणि सर्व डोंगल सेवा १३ फेब्रुवारीपर्यंत खंडित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. संयुक्त शेतकरी मोर्चा आणि शेतकरी कामगार मोर्चासह २०० हून अधिक शेतकरी संघटनांनी १३ फेब्रुवारी (मंगळवार) रोजी 'चलो दिल्ली'ची हाक दिली आहे. पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) हमी देण्यासाठी कायदा लागू करण्यासह विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणणे हा या मोर्चाचा उद्देश आहे. त्या पार्श्वभूमीवर अंबाला, कुरुक्षेत्र, कैथल, जिंद, हिस्सार, फतेहाबाद आणि सिरसा या जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात येणार आहे. हेही वाचा >> बाबा सिद्दीकींचा अजित पवार गटात जाहीर प्रवेश; म्हणाले, “४८ वर्षांनी…” हरियाणा प्रशासनाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, व्हॉईस कॉल वगळता मोबाईल नेटवर्कवरील बल्क एसएमएस आणि सर्व डोंगल सेवा खंडित करण्यात येणार आहेत. हा आदेश ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजल्यापासून १३ फेब्रुवारी रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत लागू राहील. दरम्यान, शेतकऱ्यांच्या 'दिल्ली चलो' मोर्चामुळे अंबाला, जिंद आणि फतेहाबाद जिल्ह्यांमध्ये पंजाब आणि हरियाणामधील सीमा सुरक्षित करण्यासाठीही उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. अंबालामध्ये हरियाणा पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून बॅरिकेडिंग करण्यात येत आहे. हरियाणाचे पोलीस महासंचालक शत्रुजीत कपूर, पोलीस महानिरीक्षक (अंबाला रेंज) सिवास कविराज आणि अंबाला पोलीस अधीक्षक जशनदीप सिंग यांनी सीमावर्ती भागाला भेट दिली. चंदीगडहून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांना डेराबस्सी, बरवाला/रामगढ, साहा, शाहबाद, कुरुक्षेत्र मार्गे किंवा पंचकुला, NH-344 यमुनानगर इंद्री/पिपली, कर्नाल मार्गे पर्यायी मार्गाने जाण्यास सांगितले आहे. केंद्रीय निमलष्करी दलांच्या ५० तुकड्या तैनात हरियाणा पोलिसांनी राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्रीय निमलष्करी दलांच्या ५० तुकड्या तैनात केल्या आहे. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना नियोजित मोर्चात परवानगीशिवाय सहभागी न होण्यास सांगण्यात आले असून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. सर्वसामान्य जनतेला केवळ अत्यावश्यक परिस्थितीतच प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिंद आणि फतेहाबाद जिल्ह्यातही अशीच सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी अंबाला-शंभू सीमा, खनौरी-जिंद आणि डबवली सीमेवरून दिल्लीला जाण्याचे नियोजन केले आहे.