Israel PM Netanyahu warns Iran: इराण आणि इस्रायल यांच्यात आता संघर्ष पेटला असून काल रात्री इराणने इस्रायलची राजधानी तेल अविववर हल्ला केला. या हल्ल्यानंतर आता इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू यांनी इराणला इशारा दिला आहे. इराणने आमच्यावर क्षेपणास्त्र डागून खूप मोठी चूक केली आहे. त्यामुळे त्यांनी आता परिणामांसाठी तयार राहावे, असे उत्तर इस्रायलने दिले आहे. इराणने इस्रायलवर २०० बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागल्यानंतर संपूर्ण इस्रायलमध्ये सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. इस्रायलमध्ये आप्तकालीन सायरन वाजविण्यात आला असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले गेले आहे.

इराणच्या हल्ल्यानंतर नेत्यानाहू यांनी इशारा देताना म्हटले की, जो कुणी आमच्यावर हल्ला करेल, त्याला आम्ही हल्ल्याने उत्तर देऊ. तसेच इराणच्या हल्ल्याला आम्ही परतवून लावले आहे. या अपयशी हल्ल्याला लवकरच प्रत्युत्तर दिले जाईल. हमास आणि हेझबोलाची जी अवस्था केली आहे, तीच इराणची केली जाईल, असेही ते म्हणाले.

इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने इस्रायलवर हल्ला चढवला, या हल्ल्यात इस्रायल व्याप्त वेस्ट बँक येथील एका पॅलेस्टिनी नागरिकाचा मृत्यू झाला.

इराणच्या हल्ल्यामुळे मध्य पूर्व आशियातील हिंसक वातावरणात आणखी वाढ झाल्याचे दिसत आहे. मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात हमासने इस्रायलवर हल्ला केल्यापासून या प्रदेशात युद्धग्रस्त वातावरण आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इस्रायलने हेझबोलाचा लेबनानमधील नेता हसन नसराल्लाह, हमासचा नेता इस्माईल हनीयेह आणि रेव्होल्युशनरी गार्ड्स डेप्युटी कमांडर अब्बास निलफोरौशन यांची हत्या केल्यानंतर त्याचा सूड उगविण्यासाठी इराणने हल्ला चढविला असल्याचे सांगितले जाते.