एपी, तेहरान
इराणमधील प्रत्येक केंद्रावर युरेनियमचे समृद्धीकरण पूर्णपणे थांबवण्यात आले असल्याचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी रविवारी सांगितले. अमेरिका आणि इस्रायलने जून महिन्यात इराणच्या सर्वात महत्त्वाच्या अणुऊर्जा केंद्रांवर बॉम्बहल्ले केले होते. तेव्हापासून या केंद्रांवर कोणत्याही प्रक्रिया होत नाही, असे अराघची ‘असोसिएटेड प्रेस’शी बोलताना म्हणाले.
इराणच्या अणुकार्यक्रमाबद्दल अराघची यांनी दिलेली माहिती हे जूनमधील बॉम्बहल्ल्यानंतर अणुक्रेंदांसंबंधी इराण सरकारमधील कोणीही आतापर्यंत दिलेले सर्वात स्पष्ट उत्तर आहे. युरेनियम समृद्धीकरणाबद्दल माहिती देऊन अराघची हे इराणच्या अणुकार्यक्रमावर पाश्चात्त्य देशांबरोबर वाटाघाटी करण्यास तयार आहोत, असे संकेत देत असल्याचे मानले जात आहे. “मात्र, या मुद्द्यावर अमेरिका आणि अन्य जगासाठी आपला संदेश स्पष्ट आहे, इराणला युरेनियम समृद्ध करण्याचा, आण्विक तंत्रज्ञानाचा शांततापूर्ण मार्गाने वापर करण्याचा अधिकार नाकारता येणार नाही,” असे अराघची यांनी स्पष्ट केले. अमेरिकेसह जागतिक समुदाय आमचा अधिकार मान्य करेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
इराणमध्ये युरेनियम समृद्धीची कोणतीही अघोषित केंद्रे नाहीत. आमच्या केंद्रांवर हल्ले झाल्यामुळे समृद्धीकरण केले जात नाही. आमच्या सर्व केंद्रांवर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाकडून देखरेख केली जात आहे. – अब्बास अराघची, परराष्ट्रमंत्री, इराण
युद्धात इराणची भूमिका
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित ‘इन्स्टिट्युट फॉर पॉलिटिकल अँड इंटरनॅशनल स्टडीज’ने तेहरानमध्ये एक परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये जूनमध्ये अमेरिका व इस्रायलबरोबर झालेल्या १२ दिवसांच्या युद्धावर इराणच्या दृष्टिकोनातून राजकीय विश्लेषण विषद करणाऱ्या निबंधांचा समावेश होता. या युद्धात अमेरिका व इस्रायलने केलेले आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आणि इराणने स्वतःचा केलेला बचाव, हा विषय परिषदेत प्रामुख्याने सादर करण्यात आला.
