आयसिसचा प्रमुख दहशतवादी जिहादी जॉन उर्फ महंमद इमवाझी उर्फ अबू मुहारिब अल मुहाजिर याचा मृत्यू झाल्याच्या माहितीवर या संघटनेच्या दाबिक या नियतकालिकाने ताज्या अंकात शिक्कामोर्तब केले आहे.

अमेरिकी अधिकाऱ्यांनी सांगितले की, नोव्हेंबरमध्ये सीरियातील रक्का येथे जिहादी जॉन ड्रोन हल्ल्यात ठार झाला होता, तो इंग्रजी बोलत असे. आयसिसचा बालेकिल्ला असलेल्या रक्का येथे तो ठार झाला. आयसिसने प्रथमच त्याची कबुली दिली आहे. जिहादी जॉनवर दाबिक नियतकालिकाने दोन पानांचा लेख प्रसिद्ध केला आहे त्यात म्हटल्यानुसार तो ड्रोन हल्ल्यात ठार झाला. तो नेहमी चेहरा झाकलेला ठेवत असे व अनेक ओलिसांना मारल्याच्या व्हिडिओत तो नखशिखांत काळ्या कपडय़ात दिसला आहे, त्याचे डोळे व आवाज तसेच चाकू हातात धरण्याची पद्धत ही वेगळी वैशिष्टय़े होती. दाबिकने त्याचे छायाचित्र चेहरा झाकलेला नसतानाच्या रूपात छापले आहे. तो ईशान्य अरब द्वीपकल्पातील होता व तरूण वयात परिवारासह लंडनला आला, तेथे त्याच्यात द्वेषभावना निर्माण झाल्या. इमवाझी कुवेतमध्ये जन्मला नंतर तो लंडनला गेला तेथे त्याने मूलतत्त्ववादी प्रशिक्षण सुरू केले. नंतर २००९ मध्ये टांझानियाला गेला. पूर्व आफ्रिकेतील देशात तो सफारीवरही गेला होता पण तेथे त्याला पकडण्यात आले. ब्रिटनमध्ये त्याला २०१० मध्ये दहशतवाद विरोधी पथकाने पकडले पण नंतर तो २०१२ मध्ये सीरियात गेला व आयसिसमध्ये सामील झाला. नंतर त्याने लोकांचे अपहरण करून त्यांचे शिरच्छेद केले व त्याची चित्रणे जाहीर करण्यात आली. त्यामुळे जिहादी जॉन म्हणजे लोकांच्या मनात धडकी भरत असे. २०१४ मध्ये तो जेम्ल फॉली या अमेरिकी पत्रकाराला धमकावतानाची पहिली चित्रफीत आली होती. फॉलीचा त्याने शिरच्छेद केला होता. अमेरिकी पत्रकार स्टीव्हन सॉटलॉफ, ब्रिटिश कार्यकर्ता डेव्हीड हेन्स, अलन हेिनग, अमेरिका कार्यकर्ता अब्दुल रहमान कासिग व जपानी पत्रकार केन्जी गोटो यांचा शिरच्छेदही जॉननेच केला होता.

तो माझा भाऊ नाही- कोनिका

नवीन जिहादी जॉन भारतीय वंशाचा असल्याचे मानले जात असून दृश्यफितीत दिसणारा सदर दहशतवादी माझा भाऊ नसावा व असेल तर त्याच्यात मूलतत्त्ववादी विचारांचे विष कसे आले हे आमच्या कुटुंबाला समजत नाही असे त्याची बहीण कोनिका धर हिने हाऊस ऑफ कॉमन्सच्या परराष्ट्र समितीसमोर झालेल्या सुनावणीत सांगितले, सदर दृश्यफितीत असलेला दहशतवादी तिचा भाऊ सिद्धार्थ धर असल्याचे सांगण्यात आले होते, त्यात तो ब्रिटिश गुप्तहेरांना ठार मारताना दिसत आहे. दृश्यफितीतील व्यक्ती माझा भाऊ नाही, ज्याने हे कृत्य केले तो माझा भाऊ असेलच कसा असा सवाल कोनिकाने केला. सिद्धार्थ धर याने आता अबु रूमायसाह असे नाव धारण केले आहे व तो हिंदू धर्मातून इस्लाममध्ये धर्मातरित झाला आहे.