इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून संयुक्त अरब अमिरातीने भारतात पाठवलेल्या महिलेला येथे अटक करण्यात आली आहे. अफशा जबीन ऊर्फ निकी जोसेफ असे तिचे नाव असून ती हैदराबादची आहे. ती ब्रिटिश नागरिक असल्याचा बहाण करीत होती व युवकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून इसिससाठी भरती करीत होती. ती, तिचा नवरा व मुले यांना अमिरातीतून काढून टाकण्यात आले.
अबू धाबी येथे ती सापडली. प्राथमिक जाबजबाबानंतर तिला भारतात पाठवण्यात आले. ती हैदराबादला येताच पोलिसांनी तिला अटक करून जाबजबाब घेतले व गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सांगितले की, अफशा जबीन हिला आरजीआय विमानतळावर अटक करण्यात आली. ती सलमान मोहिउद्दीन प्रकरणातील सहआरोपी आहे. तिला न्यायालयात हजर करण्यात आले व पुढील चौकशी सुरू आहे. सलमान मोहिउद्धीन हा हैदराबादचा असून त्याला जानेवारीत विमानतळाजवळ अटक करण्यात आली होती. तो तुर्की मार्गे सीरियाला जाण्यासाठी दुबईच्या विमानात बसत असताना पकडला गेला होता. नंतर अफशा सुरक्षा दलांच्या रडारवर होती. सलमान याने निकी जोसेफ या दुबईतील ब्रिटिश नागरिकाबरोबर अनेक फेसबुकखाती उघडल्याची कबुली दिली होती. तिने त्याच्यावर प्रभाव टाकून आधी दुबईला येऊन नंतर सीरियाला जाण्यास सांगितले होते. भारतीय सुरक्षा दलांनी ब्रिटिश सुरक्षा दलांना सलमानने जे दावे केले होते त्याची माहिती दिली होती. भारतीय सुरक्षा दलांनी तपास केला असता ती भारतीय असल्याचे
लक्षात आले. नंतर ती जबीन असून संयुक्त अरब अमिरातीत असल्याचे समजले. दोघांनीही युवकांना इसिसच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता.