अरबी समुद्रात भारतीय सागरी हद्दीत एका इस्रायली व्यापारी जहाजावर ड्रोन हल्ल्या झाल्याची बातमी समोर येत आहे. या हल्ल्यानंतर जहाजावर आग लागली असून जहाजाचे नुकसान झाले असल्याचे कळते आहे. मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही. युनायटेड किंग्डम मेरिटाइम ट्रेड ऑपरेशन्स आणि समुद्री सुरक्षा एजन्सी एंब्रे यांच्या हवाल्याने एएफपी वृत्त संस्थेने सदर माहिती दिली आहे. या जहाजाचे नाव एमव्ही केम प्लूटो असून हे जहाज सौदी अरेबियातून क्रूड इंधन मंगळुरूकडे घेऊन जात होते. भारतीय नौदलाने या जहाजाच्या मदतीसाठी तात्काळ एक युद्धनौका रवाना केली आहे.

एमव्ही केम प्लूटो या जहाजावर २० भारतीय नागरिक आहेत. अरबी समुद्रात पोरबंदर किनाऱ्यापासून २१७ नॉटिकल माईल्स अंतरावर इंडियन एक्सक्लुजिव्ह इकॉनॉमिक झोन (EEZ) मध्ये सदर हल्ला झाला. भारतीय नौदालाचे विक्रम हे लढाऊ जहाज ईईझेड झोनमध्ये गस्तीवर होते. या जहाजाला इस्रायलच्या जहाजाची मदत करण्यासाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती एएनआय संस्थेने दिली.

जहाजावरील आग विझवण्यात आली आहे. मात्र जहाजाच्या कामावर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. “या हल्ल्यामुळे जहाजाचे संरचनात्मक नुकसान झाले असून पाणी जहाजात घुसले आहे. हे जहाज इस्रायलचे असून हल्ला झाल्यानंतर त्यांनी सर्वात आधी सौदी अरेबियाशी संपर्क साधून याची माहिती दिली”, अशी माहिती रॉयटर्स या संस्थेने दिली. .

इराणचा पाठिंबा असलेल्या हुती दहशतवाद्यांनी सदर हल्ला ड्रोन आणि क्षेपणास्त्राद्वारे केला असल्याचे सांगितले जात आहे. इस्रायलने गाझा पट्टीवर हल्ला केल्यानंतर हुथींनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ इस्रायलच्या विरोधात उघड भूमिका घेतलेली दिसत आहे.