जेरुसलेम : ‘हमास’ या अतिरेकी संघटनेचा तळ असलेल्या गाझा पट्टीला संपूर्ण वेढा द्या. तेथील वीज, अन्न, इंधन पुरवठा तोडा असे आदेश इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी आपल्या सैन्यदलास सोमवारी दिले. याचा फटका तब्बल २३ लाख नागरिकांना बसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> “भारताने जन्म दिला तर इस्रायलने जीवन”, युद्धभूमीत अडकलेल्या प्रमिला प्रभुंना सतावतेय मुलांची आठवण

शनिवारी पहाटे हमासने केलेल्या सुनियोजित हल्ल्यामध्ये इस्रायलच्या काही सैनिकांसह ७०० नागरिकांचा मृत्यू झाला. इस्रायलचे संरक्षणमंत्री योआव गॅलण्ट यांनी सोमवारी आपल्या सैन्यदलास याबाबत पहिले थेट आदेश जारी केले. ‘‘आपली लढाई रानटी (अतिरेक्यांशी) असून त्यानुसारच उत्तर दिले जाईल,’’ असे ते म्हणाले. दुसरीकडे सलग तिसऱ्या दिवशी इस्रायलने गाझा पट्टीमधील हमासच्या संभाव्य तळांवर हवाई हल्ले सुरूच ठेवले आहेत.  यामध्ये आतापर्यंत ५६० पॅलेस्टिनी नागरिकांचा बळी गेला असून २,९०० जण जखमी झाल्याची माहिती गाझाच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.

भारतीय रुग्णसेविका जखमी

इस्रायलमधील अ‍ॅश्केलन येथे रुग्णसेविका म्हणून काम करणारी शीजा आनंद ही भारतीय महिला ‘हमास’च्या हल्ल्यात जखमी झाली आहे. त्यांच्या हाताला आणि पायाला जखमा झाल्या असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.