इस्रायल आणि हमास युद्ध आता दुसऱ्या टप्प्यात गेल्याचं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी जाहीर केलं. यावेळी त्यांनी ही ‘करा किंवा मरा’ अशी स्थिती असल्याची माहिती दिली. तसेच इस्रायलचे अतिरिक्त सैन्यबळ गाझात दाखल झाले आहे असून ते हमासच्या दहशतवाद्यांना जमीन, हवा आणि समुद्र अशा तिन्हा मार्गांनी उद्ध्वस्त करतील, असंही नमूद केलं.

नेतान्याहू म्हणाले, “मी हमासने अपहरण केलेल्या आणि युद्धात मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबियांना भेटलो. लोकांचं अपहरण करणं हा मानवतेविरोधातील गुन्हा आहे. अपहरण झालेल्या लोकांना परत आणण्यासाठी सरकार शक्य त्या सर्व मार्गांचा अवलंब करेन.”

“हमासबरोबरचं युद्ध इस्रायलचा दुसरा स्वातंत्र्यलढा”

“हमासबरोबरचं युद्ध इस्रायलचा दुसरा स्वातंत्र्यलढा आहे. हा संघर्ष दीर्घकाळ चालणारा आणि कठीण असेल. इस्रायलचे सैन्य लढा देतील आणि आपल्या मातृभूमीचं रक्षण करतील. सध्या करा किंवा मरा अशी परिस्थिती आहे. ही परीक्षा सुरू आहे आणि त्याचा निकाल आम्हाला माहिती आहे. आम्हीच विजयी होऊ,” असं नेतान्याहू यांनी म्हटलं.

हेही वाचा : इस्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचा मोठा निर्णय, ब्रिगेडियर जनरल रायडर म्हणाले…

“सैनिकांची सुरक्षितता आणि देशाच्या भविष्याचा विचार करून कारवाई”

“गाझात सैन्य कारवाया वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने एकमताने घेतला आहे. सैनिकांची सुरक्षितता आणि देशाचं भविष्य यांचा विचार करून संतुलितपणे ही कारवाई राबवली जाईल,” असंही नेतान्याहू यांनी नमूद केलं.