वृत्तसंस्था, गाझा
इस्रायली फौजांनी मंगळवारी गाझा पट्टीत हमासवर जोरदार हल्ला केला. इस्रायलने सलग चौथ्या दिवशी उत्तर गाझाला लक्ष्य केले. हमासने जमिनीखाली बांधलेली भुयारे आणि बांधकामे यांना लक्ष्य केल्याची माहिती इस्रायलच्या सैन्याकडून देण्यात आली. तसेच या हल्ल्यात पश्चिम किनारपट्टीमधील हमासच्या वरिष्ठ नेत्याचे घर उद्ध्वस्त झाल्याचीही माहिती देण्यात आली.
या कारवाईदरम्यान उत्तर गाझामधून जवळपास आठ लाख लोकांनी स्थलांतर केल्याचा दावा इस्रायली फौजांकडून करण्यात आला. तर हा आकडा १४ लाखांपेक्षा जास्त असल्याची माहिती यापूर्वी देण्यात आली आहे. लष्करी कारवाईबरोबरच इस्रायलकडून हवाई हल्लेदेखील करण्यात आले. त्यामध्ये वेढा घातलेल्या संपूर्ण प्रदेशाला लक्ष्य करण्यात आले. इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये गाझामधील दोन रुग्णालयांचे नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली.
हेही वाचा >>>“मोदी सरकारकडून विरोधकांचे फोन हॅक करण्याचा प्रयत्न”, केंद्रीय मंत्री आणि Apple कंपनी स्पष्टीकरण देत म्हणाले…
हमासच्या ताब्यातील एका सैनिकाची सुटका करण्यात यश आल्यानंतर पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी युद्धविरामाचे आवाहन नाकारले तसेच हमासला चिरडून टाकण्याचा इरादा व्यक्त केला. आपल्या फौजांनी सोमवारी हमासच्या ३०० पेक्षा जास्त ठिकाणांवर हल्ले केल्याची माहिती इस्रायलकडून देण्यात आली.
पॅलेस्टिनींचे आश्रयस्थान
युद्ध सुरू झाल्यापासून गाझा पट्टीतील ६ लाख ७२ हजार लोकांनी संयुक्त राष्ट्रांच्या स्थलांतरितांसाठीच्या संस्थेच्या शाळा आणि इतर आस्थापनांमध्ये आश्रय घेतला आहे.
संयुक्त राष्ट्रांची मोठी प्राणहानी
युद्ध सुरू झाल्यापासून यूएनआरडब्लूएचे ६४ कर्मचारी मारले गेले आहेत. जगामध्ये संघर्ष सुरू असलेल्या कोणत्याही प्रदेशात इतक्या अल्प काळात मारले गेलेल्या मदत कर्मचाऱ्यांची ही सर्वोच्च संख्या आहे.
हेही वाचा >>>राष्ट्रपतींची ‘मेजर’ कारवाई! संरक्षण दलाच्या ‘या’ विभागातील अधिकाऱ्याची तडकाफडकी हकालपट्टी
युद्धविराम नाही तर मत नाही!
वॉशिंग्टन : गाझा पट्टीमध्ये युद्धविराम न झाल्यास मत देणार नाही असा इशारा अमेरिकेतील काही मुस्लीम गटांनी अध्यक्ष जो बायडेन यांना दिला आहे. काही मुस्लीम अमेरिकी गट आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी इशारा दिला की, बायडेन यांना २०२४ च्या निवडणुकीसाठी देणग्या आणि मते देऊ नयेत असे आवाहन अमेरिकेतील लक्षावधी मुस्लिमांना करण्यासाठी आम्ही काम करू.
गाझासाठी निधी उभारणी
न्यूयॉर्क : अमेरिकेतील पॅलेस्टिनी लोक आणि मदत संघटना गाझा पट्टीतील लोकांसाठी निधी उभारत आहेत. यामध्ये आतापर्यंत विक्रमी निधी उभारण्यात आला असला तरी इस्रायलच्या वेढय़ामुळे हा निधी युद्धग्रस्त लोकांपर्यंत पोहोचवण्यात अडचणी येत आहेत. मदतकार्याला पाठिंबा म्हणून लोकांकडून मोठय़ा प्रमाणात मदत सामग्री प्राप्त होत असल्याचे या संघटनांनी सांगितले.