एपी, खान युनिस (गाझा)
इस्रायली फौजा आणि रणगाडय़ांनी गाझापट्टीत सोमवारी आगेकूच केली. उत्तर गाझाच्या पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही दिशांनी जोरदार हल्ले करण्यात आले. त्याच्या जोडीला हवाई हल्लेदेखील सुरू आहेत. हे हवाई हल्ले हजारो पॅलेस्टिनी लोकांनी आश्रय घेतलेल्या आणि हजारो जखमींवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयांजवळ झाले असल्याचा धोक्याचा इशारा संयुक्त राष्ट्रे आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दिला.
आतापर्यंत या युद्धामध्ये ८,३०० पेक्षा जास्त पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. समाजमाध्यमांवर प्रसृत झालेल्या एका चित्रफितीमध्ये मध्य गाझामध्ये इस्रायली रणगाडे आणि बुलडोझर यांनी मुख्य महामार्ग रोखून धरल्याचे दिसले. हा मार्ग असाच बंद झाला तर उत्तर गाझामध्ये अडकलेल्या पॅलेस्टिनींना आपली सुटका करून घेता येणे शक्य होणार नाही, कारण दक्षिणेकडे जाण्यासाठी हा एकमेव वापरण्याजोगा मार्ग उरला आहे.
हेही वाचा>>>>दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना ईडीचं समन्स, नेमकं प्रकरण काय?
तीन ओलीस महिलांची दृश्यफीत जारी
हमासने ओलीस ठेवलेल्या तीन महिलांची एक दृश्यफीत या संघटनेने जारी केली आहे. तीनपैकी एक महिला या दृश्यफितीत एक लघुसंदेश देत असून, ओलीस संकटाला इस्त्रायलने दिलेल्या प्रतिसादावर टीका करत आहे. ‘हमास’ने सुमारे २४० जणांना ताब्यात घेतले असून, इस्रायलच्या तुरुंगातील पॅलेस्टिनी नागरिकांच्या सुटकेच्या मोबदल्यात आपण त्यांची सुटका करू, असे त्यांनी सांगितले आहे.