पीटीआय, नवी दिल्ली : चंद्र आणि मंगळावर यान पाठवल्यानंतर, सौर मालिकेतील सर्वात उष्ण ग्रह असलेल्या शुक्राच्या पृष्ठभागाखाली काय दडले आहे हे पाहण्यासाठी त्याच्या कक्षेत भ्रमण करण्यासाठी अंतराळयान पाठवण्याची तयारी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) करत आहे. शुक्राला वेढून असलेल्या गंधकयुक्त आम्लयुक्त (सल्फ्युरिक अ‍ॅसिड) ढगांखालील रहस्यांचा शोध घेणे हाही या मोहिमेचा उद्देश आहे.

 शुक्र मोहिमेवर विचार झालेला आहे, तिचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे व तिच्यासाठी निधी मिळणे निश्चित झाले आहे, असे ‘शुक्र विज्ञानावरील’ एक दिवसाच्या बैठकीला संबोधित करताना इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितले. या मोहिमेच्या प्रभावी फलितावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्यांनी शास्त्रज्ञांना केले.

 ‘शुक्र मोहिमेची आखणी करणे व ती प्रत्यक्षात आणणे यांची क्षमता भारताकडे असल्यामुळे, अतिशय कमी वेळेत ही मोहीम पूर्ण करणे भारताला शक्य आहे’, असे सोमनाथ त्यांच्या उद्घाटनाच्या भाषणात म्हणाले.  ही मोहीम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करणे आणि त्यानंतरच्या वर्षांत अंतराळ यान शुक्राच्या कक्षेत फिरत ठेवणे असे लक्ष्य ठेवण्याचा इस्रोने विचार केला आहे. या वर्षांत पृथ्वी व शुक्र यांची स्थिती अशी राहणार आहे, की प्रणोदकाचा (प्रॉपेलंट) कमीत कमी वापर करून यान शुक्राच्या कक्षेत ठेवणे शक्य होणार आहे. अशा प्रकारची स्थिती त्यानंतर २०३१ साली उपलब्ध राहणार आहे.

शुक्रावरील यापूर्वीच्या मोहिमांमधील प्रयोगांची पुनरुक्ती करू नये आणि चांद्रयान-१ व मार्स ऑर्बिटर मिशन यांच्या वेळी जसे उच्च प्रभावी फलित साध्य झाले होते, तसेच पुन्हा करण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे सोमनाथ यानी सांगितले.