पीटीआय, पुरी
श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने १२ व्या शतकातील या पुरातन धार्मिक स्थळात अपुरे कपडे, फाटक्या जीन्स, स्कर्ट आणि बिनबाह्यांची वस्त्रे (स्लीव्हलेस) परिधान केलेल्या भाविकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. भाविकांसाठी देवस्थानाने ठराविक वेशभूषा संहिता (ड्रेस कोड) अनिवार्य केली आहे.
तसेच नवीन वर्षांपासून मंदिर परिसरात गुटखा आणि पान खाण्यावर तसेच प्लॅस्टिक आणि पॉलिथिनच्या वापरावर देवस्थानाने संपूर्ण बंदी घातली आहे. श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाच्या (एसजेटीए) एका अधिकाऱ्याने सांगितले की, मंदिर प्रवेशासाठी भाविकांना सभ्य वस्त्र परिधान करावे लागतील. या आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड आकारण्यात येत आहे. दरम्यान, नववर्षांच्या दिवशी भगवान जगन्नाथाच्या दर्शनासाठी पुरीमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटे एक वाजून ४० मिनिटांनी रांगेत ताटकळत उभे असलेल्या भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे पुन्हा उघडण्यात आले. पुरी पोलिसांनी ‘एक्स’वर एका नमूद केले, की सोमवारी दुपारी बारापर्यंत एक लाख ८० हजारांहून अधिक भाविकांनी जगन्नाथ धामचे दर्शन घेतले.