बिहार विधानसभेच्या निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्यानंतर आता जद(यू), पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात सर्व विरोधी पक्षांचे ऐक्य करण्यासाठी सरसावला आहे. बिहारच्या निवडणुकीमुळे देशात बिगर-भाजप राजकारणाचे पर्व सुरू झाले आहे, असेही जद(यू)ने म्हटले आहे.विधानसभा निवडणुकीत सलग तिसरा विजय मिळविणाऱ्या नितीशकुमार यांच्याकडे मोदींना राष्ट्रीय पर्याय म्हणून पाहिले जात आहे.
बिहारमध्ये व्यक्तिमत्त्वाच्या स्पर्धेत नितीशकुमार यांनी मोदींपेक्षा भरीव कामगिरी केली आहे आणि मोदींविरुद्ध राष्ट्रीय आघाडीचे नेतृत्व करण्याची क्षमताही नितीशकुमार यांच्यात आहे, असे पक्षाने म्हटले आहे.
तथापि, अशा प्रकारच्या आघाडीचे नेतृत्व करण्याचा निर्णय संबंधित पक्षांनी घ्यावयाचा आहे. नितीशकुमार यांची प्रतिमा चांगली असून त्यांच्यात क्षमताही आहे, असे जद(यू)चे प्रदेशाध्यक्ष वसिष्ठ नारायण सिंह यांनी म्हटले आहे. केंद्रातील सरकारला कोंडीत पकडण्यासाठी सर्व पक्षांनी किमान समान कार्यक्रम निश्चित करावा, असेही ते म्हणाले.
देशात यापूर्वी बिगर काँग्रेस सरकारचा प्रयोग झाला होता, आता बिहारमधून बिगर भाजप राजकारण सुरू झाले आहे. व्यक्तिमत्त्व, विचारसरणी आणि कार्य याबाबतीत जनतेने नितीशकुमार यांच्यावर शिक्कामोर्तब केले, असेही ते म्हणाले. संसदेत जीएसटी विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत विविध पक्षांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.