जद(यू) आणि राष्ट्रीय जनता दलात (राजद) सौहार्दाचे वातावरण निर्माण होत असतानाच बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी मकरसंक्रांतीनिमित्त लालूप्रसाद यादव यांचे मेहुणे साधू यादव यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची लक्षणे दिसत आहेत. पक्ष आणि सरकारच्या नावाला काळिमा लागेल अशी कृती करणे मांझी यांनी टाळले पाहिजे, असे जद(यू)ने म्हटले आहे.
मकरसंक्रांतीच्या निमित्त मांझी यांनी अनिरुद्धप्रसाद ऊर्फ साधू यादव यांच्या निवासस्थानी भेट दिली. बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा सुशासनाचा कार्यक्रम आपण पुढे नेत असल्याचे मांझी यांचे म्हणणे आहे. मात्र ज्या व्यक्तीची गुन्हेगारी पाश्र्वभूमी आहे, त्या व्यक्तीला भेटणे म्हणजे सुशासन आहे का, असा सवाल जद(यू)चे प्रवक्ते नीरजकुमार यांनी केला आहे.
नितीशकुमार यांनी सुरू केलेल्या सुशासनाच्या मार्गावरूनच मांझी यांनी वाटचाल करावी, पक्षाच्या नावाला काळिमा फासणारी कृती मांझी यांनी टाळावी, अशी आपली सूचना असल्याचे नीरजकुमार यांनी वार्ताहरांना सांगितले.