दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचा (जेएनयू) विद्यार्थी नजीब अहमद बेपत्ता होऊन सुमारे २ वर्षे झाली. देशातील सर्वांत मोठी तपास यंत्रणा असलेल्या सीबीआयला अजूनही त्याचा शोध घेता आलेला नाही. नजीब गायब होऊन १ वर्षे ११ महिने १४ दिवस झाले आहेत. परंतु, सीबीआयला अद्याप कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. आता सीबीआयच्या अपिलावर दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणी क्लोजर रिर्पोट दाखल करण्याची परवानगी दिली आहे.

दि. १५ ऑक्टोबर २०१६ रोजी जेएनयूतील एमएस.सीचा विद्यार्थी नजीब अहमद विद्यापीठा आवारातून गायब झाला होता. तेव्हापासून त्याचा शोध घेतला जात होता. यावरुन अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आली. नजीबच्या आईने अनेकवेळा सरकारसमोर प्रश्न उपस्थित केले. परंतु, त्यांच्या मुलाचा कोणताच ठावठिकाणी लागला नाही. उच्च न्यायालयाने याप्रकरणी मे २०१७ मध्ये सीबीआयकडे तपास सोपवला होता.

बेपत्ता होण्यापूर्वी नजीबची अभाविपच्या कार्यकर्त्यांबरोबर वाद झाला होता. मात्र नजीबच्या बेपत्ता होण्यामागे आमचा काही संबंध नसल्याचे अभाविपच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर नजीब रिक्षामधून कुठेतरी जाण्यासाठी वसतिगृहातून बाहेर पडला होता. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अनेक दिवस याचा तपास केला. पण त्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यानंतर सीबीआयकडे हे प्रकरण आले.

याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी संशयावरुन ९ विद्यार्थ्यांची चौकशी केली होती. पण त्यांना कोणत्याच निर्णयावर येता आले नव्हते. या विद्यार्थ्यांनीही नजीबच्या बेपत्ता होण्यामागे आमचा काहीच संबंध नसल्याचे म्हटले होते.