माजी सरन्यायाधीश जगदीश शरण अर्थात जे. एस. वर्मा यांचे सोमवारी निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. यकृतात बिघाड झाल्याने गुरगाँव येथील रुग्णालयात शुक्रवारी त्यांना दाखल करण्यात आले होते. मात्र विविध अवयव निकामी झाल्याने त्यांची प्रकृती ढासळत गेली होती.
दिल्लीतील सामूहिक बलात्कारानंतर बलात्कारविरोधी कायद्यांचा आढावा घेऊन कठोर कायदे सुचविण्यासाठी नेमल्या गेलेल्या समितीचे ते प्रमुख होते. या समितीने जानेवारी २०१३ मध्ये आपला अहवाल दिला होता. सक्षम प्रशासनाअभावी महिलांच्या विरोधातील गुन्ह्य़ांमध्ये वाढ झाल्याचे वर्मा यांनी अहवाल सादर करताना नमूद केले होते. ज्यांनी कारवाई करायची तेच निक्रीय होणे धक्कादायक असल्याचे मत त्यांनी नोंदवले होते.
मध्य प्रदेशात जन्म झालेले वर्मा यांनी १९५५ मध्ये न्याययंत्रणेतील कारकिर्दीला सुरुवात केली होती. मध्य प्रदेश आणि राजस्थान राज्यांचे मुख्य न्यायाधीश ते देशाचे २७ वे सरन्यायाधीश असा त्यांचा प्रवास झाला.