भविष्यात पाकिस्तानने कोणतेही नृशंस कृत्य करू नये म्हणून त्याच्याविरोधात अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी एन.के.कालिया यांनी केली आहे. एन. के. हे १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धात धारातीर्थी पडलेले कॅ. सौरभ कालिया यांचे वडील आहेत.
कॅप्टन सौरभ यांच्यासह अन्य पाच जवानांवर पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयात अनन्वित अत्याचार करण्यात आले होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचे सामने, व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढविण्यापेक्षा भारताने पाकिस्तानविरोधात अत्यंत कडक कारवाई केली तर भारताविरोधात असे दुस्साहस करण्याचे धाडस पाकिस्तानला कधी होणार नाही, असे मत कालिया यांनी व्यक्त केले. आता भारताने अत्यंत कठोर, निर्णायक अशी कृती केली नाही तर यापुढेही अशीच कृत्ये पाकिस्तानकडून होत राहतील, असा इशाराही त्यांनी
दिला.
कॅप्टन सुभाष आणि कारगिल युद्धात धारातीर्थी पडलेल्या अन्य पाच हुतात्म्यांची बाब आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायासाठी मांडण्यासाठी भारत सरकारला आदेश द्यावा, या मागणीसाठी कालिया यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने भारत सरकारला गेल्या १४ डिसेंबर रोजी नोटीस जारी केली आहे. आपल्या मुलास युद्धकैदी म्हणून पकडण्यात आले, परंतु जिनिव्हा कराराचा भंग करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली, असे कालिया यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.  कॅ. कालिया आणि पाच अन्य जवान गस्त घालीत असताना त्यांना पकडून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. त्यांना नंतर ठार मारून त्यांचे छिन्नविच्छिन्न झालेले मृतदेह भारतीय अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आले होते. मानवतेस काळिमा फासून अशी दुष्ट कृत्ये करणाऱ्या पाकिस्तानला न्यायासनासमोर खेचून शिक्षा करणेच आवश्यक आहे, या शब्दांत कालिया यांनी आपला संताप व्यक्त केला.
निवृत्त लेफ्ट. जनरल हरदेव सिंग लिड्डर यांनी २००३ मध्ये हिल काका परिसरात ‘सर्प विनाश’कारवाई केली होती. पाकिस्तानला जी भाषा समजते, त्याच भाषेत त्यांना उत्तर द्यायला हवे, असे हरदेव सिंग म्हणाले.