दक्षिण दिग्विजयासाठी भाजपची, तर सत्ता आणि प्रतिष्ठा टिकवण्यासाठी काँग्रेसची निर्वाणीची धडपड

बेंगळूरु : २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकीची उपान्त्य फेरी म्हणून पाहिल्या जात असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील कटू प्रचाराची गुरुवारी सांगता झाली. दक्षिण भारतातील प्रवेशासाठी कर्नाटकचा उंबरठा ओलांडण्याची भाजपची धडपड आहे, तर सत्ता आणि प्रतिष्ठा टिकवण्याची काँग्रेसची धडपड आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी परस्परांवर अत्यंत भडक विखारी प्रचार केला होता. तो गुरुवारी थंडावला असून त्या प्रचाराचा कितपत प्रभाव मतदारांवर पडला, याचा प्रत्यय मतदानातून येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे भाजपचे वलयांकित प्रचारक होते. तर मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी या काँग्रेसच्या वलयांकित प्रचारक होत्या. तरीही परस्परांविरुद्ध खरी प्रचारराळ मोदी आणि राहुल गांधी यांनीच उडवली. भ्रष्टाचारावरून दोन्ही पक्षांनी एकमेकांना शब्दांनी बोचकारले तसेच सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाच्या मुद्दय़ाचे नाणे मोदींपासून भाजपच्या अनेक नेत्यांनी वाजवून पाहिले.

सोनिया गांधी यांच्या इटालियन वंशाबद्दल आणि त्यांच्या इटालियन उच्चाराबाबत टर उडवणाऱ्या भाजप नेत्यांची काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी हजेरी घेतली. ‘‘माझी आई ही भारतात जन्मलेल्या म्हणून भारतीय असलेल्या इतर अनेकांपेक्षा अनेक पटीने भारतीय आहे. तिच्या आयुष्याचा सर्वाधिक काळ तिने भारतात आणि भारतासाठीच व्यतीत केला आहे,’’ असे राहुल म्हणाले.

राहुल यांनी पंधरा मिनिटे हातात कागद न घेता कोणत्याही एका मुद्दय़ावर बोलून दाखवावे, असे आव्हान मोदी यांनी दिले होते. त्यावर मोदी यांनी येडियुरप्पा यांच्या काळातील सरकाने काय केले, हे हवेतर कागदावर लिहून पंधरा मिनिटे वाचून दाखवावे, असे प्रतिआव्हान सिद्धरामय्या यांनी दिले होते. सिद्धरामय्या यांचा उल्लेख मोदी यांनी ‘सीधा रूपय्या’ असा करीत हे दहा टक्के कमिशनवर चालणारे सरकार असल्याचा आरोप केला होता. त्यावर सिद्धरामय्या यांनी मोदी सरकार हे ९० टक्के कमिशनवर चालत असल्याचा आरोप केला होता. तसेच येडियुरप्पांसह भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या रेड्डी बंधूंना उमेदवारी का दिली गेली, असा सवाल केला होता.

राहुल यांनी पंतप्रधान होण्याची तयारी असल्याचे प्रथमच सांगितले. त्यावरही मोदी यांनी टोलेबाजी केली आणि अशा अपरिपक्व आणि सरंजामी वृत्तीच्या माणसाच्या हाती तुम्ही सत्ता देणार का, असा सवाल केला. त्यातून युवा पिढीबाबतची बुजूर्ग भाजप  नेत्यांची मानसिकताच उघड होत आहे, अशी टीका काँग्रेसने केली. सिद्धरामय्यांचे कथित ७० लाख रुपयांचे घडय़ाळ, राजराजेश्वरी मतदारसंघात एकाच घरात सापडलेली १० हजार बोगस मतदार ओळखपत्रे (जी खरी असल्याचे उघड झाले) या मुद्दय़ांचा प्रचारात समावेश होता.