अभिनेत्री केट विन्सलेट व तिचा नवीन पती नेड रॉकएनरोल हे दोघेही हनीमूनसाठी अंतराळात जाणार आहेत असे समजते. नेडचे काका सर रीचर्ड ब्रॅनसन यांनी त्याला व केट विन्सलेट या जोडप्याला मोफत अंतराळात जाण्याची व्यवस्था केली आहे. केट विन्सलेट हिने रीचर्ड ब्रॅनसन यांची आई इव्ह हिला नेकर आयलंड येथील आलिशान बंगल्यात लागलेल्या आगीतून वाचवले होते त्याचे बक्षीस म्हणून तिला मोफत अंतराळ प्रवास करण्याची संधी मिळाली आहे.
नेड हा ३४ वर्षांचा असून तो ब्रॅनसन यांच्या व्हर्जिन गॅलॅक्टिक या अंतराळ प्रवास कंपनीत अर्धवेळ काम करतो. सन ऑनलाइनने दिलेल्या वृत्तानुसार ही कंपनी पुढील वर्षीपासून व्यावसायिक अंतराळ उड्डाणे सुरू करणार आहे. एकूण ५३० जणांनी त्यासाठी नोंदणी केली असून १,२४,००० पौंडाची तिकिटे विकली गेली आहेत. अंतराळ प्रवास करणाऱ्या भावी हौशी मंडळीत अभिनेता रसेल ब्रँड, अ‍ॅशटन कुचर, कँडी ब्रदर्स व स्टीफन हॉकिंग यांचा समावेश आहे. हॉकिंग यांना ब्रॅनसन यांनी फुकट अंतराळ प्रवास करण्याची संधी दिली आहे.
नेड याने ब्रॅनसन यांच्याकडे लग्नाची भेट म्हणून मोफत अंतराळ प्रवासाची मागणी केली होती व ती त्यांनी मान्य केली. टायटॅनिक या चित्रपटातील भूमिकेमुळे गाजलेली केट विन्सलेट हिचा नेड हा तिसरा नवरा असून त्यांचा विवाह न्यूयॉर्क येथे गुप्तपणे झाला होता. त्यांनी त्यांच्या विवाहाची बातमी फक्त मित्रांना सांगितली व त्याची व्हिडिओ स्काइपवर टाकली होती.

अंतराळ प्रवास
हा अंतराळ प्रवास २ तासांचा असेल व त्यात तुम्हाला पृथ्वीच्या वर ६० मैल उंचीवर नेले जाईल. प्रवाशांना वजनरहित अवस्था अनुभवता येईल. पृथ्वीचा वक्र बघायला मिळेल. मोफत प्रवास करणारे मान्यवरकेट विन्सलेट, तिचा पती नेड रॉकएनरोल व विश्वरचना शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग.