‘गार्डियन’ वृत्तपत्राच्या १९४ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एक महिला पत्रकाराची, कॅथरीन व्हायनर यांची मुख्य संपादकपदी नियुक्ती झाली आहे. व्हीनर या सध्या ‘गार्डियन’च्या सहाय्यक संपादक (डेप्युटी एडिटर) असून या वृत्तपत्राचे विद्यमान संपादक अ‍ॅलन रसब्रिजर यांच्याकडून सूत्रे स्वीकारतील. अ‍ॅलन हे गेली दोन दशके ‘गार्डियन’चे संपादक आहेत. ‘मुख्य संपादकपदी नियुक्ती झाल्यामुळे आपण सन्मानित झाल्यासारखेच वाटत आहोत’ या शब्दांत व्हायनर यांनी आपली भावना व्यक्त केली.
‘गार्डियन’ची स्थापना १८२१ मध्ये झाल्यानंतर या वृत्तपत्राच्या संपादकपदी आतापर्यंत ११ संपादक आरूढ झाले असून ‘द स्कॉट ट्रस्ट’ च्या संचालक मंडळाने शुक्रवारी व्हायनर यांच्या नियुक्तीची घोषणा केली. या पदासाठी या महिन्याच्या प्रारंभी एक निवडणूक घेण्यात आली होती. त्यामध्ये ‘गार्डियन’ व ‘ऑब्झव्‍‌र्हर’च्या कर्मचाऱ्यांनी व्हायनर यांच्या बाजूने मोठा कौल दिला. ४३८ जणांनी व्हीनर यांच्या बाजूने प्रथम निवडीचा कौल दिला. या पदासाठी २६ पत्रकारांनी अर्ज केले होते. ‘गार्डियन’ व ‘ऑब्झव्‍‌र्हर’च्या मुख्य संपादकपदी नियुक्ती झाल्यामुळे आपला मोठा सन्मान झाला असून एका मोठय़ा जबाबदारीस आपण सामोरे जात आहोत. स्वतंत्र विचार, उल्लेखनीय पत्रकारिता, टीकात्मक विवरण आदी गुणांचा समुच्चय असलेले अत्यंत हुशार असे पत्रकार या वृत्तपत्रात जगभरात आहेत, असे व्हायनर यांनी सांगितले.
‘द स्कॉट ट्रस्ट’चे मावळते चेअरमन लीझ फॉर्गन यांनी कॅथरीन व्हायनर यांचा गौरव केला. ‘गार्डियन’ मधील आपल्या १८ वर्षांच्या कारकीर्दीत व्हीनर यांनी संघटनेत संपादक विभागात बहुतेक सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या, असे त्यांनी नमूद केले.