अफगाणिस्तानला भारताकडून लष्करी मदत हवी – करझाई
पाकिस्तानचे भावी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारताशी संबंध सुधारण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याची इच्छा व्यक्त केलेली असतानाच या आघाडीवर शरीफ यांनी सावधगिरी बाळगून टप्प्यानेच पावले उचलावीत, असा सल्ला लष्करप्रमुख अशरफ परवेझ कयानी यांनी दिला आहे.
कयानी यांनी नवाझ शरीफ यांची भेट घेतल्यानंतर त्या भेटीत हा सल्ला दिल्याचे वृत्त येथील प्रसारमाध्यमांनी दिले आहे. शरीफ यांचे बंधू शाहबाझ शरीफ यांच्या निवासस्थानी शनिवारी उभयतांची चर्चा झाली. या भेटीत कयानी यांनी नवाझ शरीफ यांचे अभिनंदन केले तसेच देशाच्या सुरक्षेबद्दलही उभयतांनी औपचारिक चर्चा केली. नव्या सरकारने अत्यंत सावधगिरी बाळगून भारताशी संबंध सुधारण्याचा विचार करावा, असे कयानी यांनी शरीफ यांना सांगितल्याचे वृत्त ‘द न्यूज’ या वृत्तपत्राने दिले. शरीफ हे गेली काही वर्षे सत्तेबाहेर असल्यामुळे त्यांना या संबंधातील नेमका अंदाज नाही. त्यामुळे त्यांनी सावधगिरी बाळगावी, असे मत कयानी यांनी व्यक्त केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९९९ मध्ये खंडित झालेली शांतता प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आपण उत्सुक असल्याचे शरीफ यांनी सांगितले.
काबूल : अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझाई उद्यापासून भारत भेटीवर येत आहेत. आपल्या दौऱ्यात ते लष्करी मदत मागणार आहेत. तसेच पाकिस्तानबरोबर सुरू असलेला वाद यावरही चर्चा केली जाईल, असे करझई यांच्या प्रवक्त्याने सांगितले.
अफगाणिस्तानचे लष्कर बळकट करण्यासाठी आम्ही भारताकडे मदत मागणार आहोत, असे करझाईंचे प्रवक्ते अईमल फैजी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे करझई यांच्या दौऱ्यावर पाकिस्तान नाराज होण्याची चिन्हे आहे. भारत अफगाणिस्तानमध्ये आपला प्रभाव वाढवत असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे. भारतासमवेत अफगाणिस्तानने लष्करी सहकार्य वाढवले तर तणाव वाढेल, असा इशारा देण्यात आला आहे. अफगाणिस्तानमध्ये शांतता स्थापित करण्यात पाकिस्तानने सहकार्य केले नाही तर अफगाणिस्तान पाकिस्ताशी शत्रुत्व असलेल्या देशांचे सहकार्य घेईल हे करझाई यांना दाखवून द्यायचे आहे.
भारत-अफगाणिस्तान आर्थिक सहकार्य वाढवण्यावरही या दौऱ्यात चर्चा होणार आहे. भारताने अफगाणिस्तानमध्ये पायाभूत सुविधा, रुग्णालय, ग्रामीण विद्युतीकरण प्रकल्पांमध्ये २ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. २०१४नंतर अफगाणिस्तानमधून अमेरिकी व इतर बाहेरील सैन्य माघारी जाईल तेव्हा त्या देशाशी उत्तम संबंध राहावेत, अशी भारताची अपेक्षा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kayani point to sharif about stay alert from india
First published on: 20-05-2013 at 03:03 IST