कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीमध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी ट्रॅक्टर रॅलीला अनेक ठिकाणी हिंसक वळण मिळाल्याचं चित्र पहायला मिळालं. मात्र या हिंसेचा संयुक्त किसान मोर्चाने निषेध केला आहे. मागील दोन महिन्यांपासून सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाअंतर्गत आज ट्रॅक्टर परेड काढण्यात आली होती. यामध्ये दिल्लीतील आयटीओ, लाल किस्सा, नांगलोई, सिंघू, टिकारी बॉर्डर आणि इतर ठिकाणी शेतकरी आंदोलकांनी हिंसा केल्यानंतर संयुक्त किसान मोर्चाने अधिकृत भूमिका जाहीर केली आहे.

संयुक्त किसान मोर्चाने जारी केलेल्या वक्तव्यामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीला शेतकऱ्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. मात्र याच आंदोलनामध्ये झालेल्या हिंसक घटनांचा विरोध करत आहे. या घटनांसाठी जे लोक जबाबदार आहेत त्यांचा संयुक्त किसान मोर्चाशी काहीही संबंध नसल्याचेही शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केल्याचं न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

VIDEO: शेतकऱ्यांपासून वाचण्यासाठी पोलिसांनी लाल किल्ल्यावरुन मारल्या उड्या

शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या  ४० शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चाने घडलेल्या हिंसेदंर्भातही भाष्य केलं आहे. आमच्या सर्व प्रयत्नानंतरही काही संघटना आणि व्यक्तींनी नियोजित मार्गाचे आणि नियमांचे उल्लंघन केलं आणि त्यांनी निंदनीय कृत्य केली. असामाजिक तत्वांनी शांततापूर्ण आंदोलनामध्ये घुसखोरी केली. आम्ही नेहमीच हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचा ठरवलं आहे. शांतता आमची सर्वात मोठी ताकद आहे. कोणत्याही प्रकारच्या नियमांचे उल्लंघन करुन आंदोलनाला नुकसान पोहचू द्यायचे नाही असा आमचा हेतू आहे.

आणखी वाचा- दिल्ली ट्रॅक्टर परेड हिंसाचार : ८३ पोलीस कर्मचारी जखमी; चार गुन्हे दाखल

शेतकरी नेत्यांनी जारी केलेल्या वक्तव्यामध्ये सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांचा हा संघर्ष सुरु असल्याचं म्हटलं आहे. मागील दोन महिन्यांहून अधिक काळापासून शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत असून त्यामुळेच आजसारखी परिस्थिती निर्माण झालीय. नियमांचे उल्लंघन करुन हिंसा करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेचा आमच्याशी काहीही संबंध नाहीय. सर्वांनी ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणे आणि ध्येयाने आंदोलन करण्याचं आम्ही सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो. कोणत्याही प्रकारची हिंसक घटना, राष्ट्रीय स्मारकांना पोहचवलेली हानी आणि इतर गोष्टींचा आमच्या मोर्चाशी काहीही संबंध नाही. असं करणाऱ्यांपासून मोर्चातील शेतकऱ्यांनी दूर रहावे असंही संयुक्त किसान मोर्चाने म्हटलं आहे.

संयुक्त किसान मोर्चाने आज नक्की काय काय घडलं यासंदर्भातील माहिती आम्ही घेत आहोत असंही म्हटलं आहे. यासंदर्भात लवकरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल अशी अपेक्षाही मोर्चाने व्यक्त केली आहे. काही ठिकाणी घडलेली हिंसा वगळता नियोजित पद्धतीने आंदोलन सुरु असल्याचेही संयुक्त किसान मोर्चाने म्हटलं आहे.