कर्नाटकच्या सत्तेतून अकाली पायउतार झाल्यानंतर जेडीएसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. १४ महिन्यांच्या कार्यकाळात मित्रपक्ष असलेल्या काँग्रेससाठी गुलामासारखं काम केलं. पण कुणीही आपली प्रशंसा केली नाही, अशी टीका कुमारस्वामी यांनी केली आहे.

कर्नाटकात जेडीएस-काँग्रेस आघाडीतील १६ आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर २३ जुलै रोजी कुमारस्वामी यांचे सरकार कोसळले. त्यानंतर मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाले आहे. मात्र, जेडीएस आणि काँग्रेसमधील असंतोष आता चव्हाट्यावर येऊ लागला आहे. यात माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनीही काँग्रेसवर तोंडसुख घेतले आहे. कुमारस्वामी म्हणाले, आमदार आणि महामंडळाच्या अध्यक्षांना कामाचे स्वातंत्र्य दिले. १४ महिन्यांच्या कालावधीत मी आमदार व काँग्रेससाठी एखाद्या गुलामाप्रमाणे राबलो. तरीही मला का दोष दिला जात आहे, हे मला माहिती नाही, असे कुमारस्वामी म्हणाले.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल त्रिशंकु लागल्यानंतर काँग्रेस नेतृत्वाची जेडीएसशी हातमिळवणी करण्याची इच्छा होती. मात्र, पक्षाच्या राज्यातील नेत्यांचा याला विरोध होता. काँग्रेससोबत आघाडी केल्यानंतर जेडीएसमधील नेते नाराज होते. तरीही मी काँग्रेसच्या मदतीने सरकार स्थापन केले. आपल्या पाठीत खंजीर खुपसला जाणार हे नाराज नेत्यांना माहिती होते.
काँग्रेसचे आमदार वेळ न घेता भेटायला यायचे. तरीही मी त्यांना भेटायचो. त्यांनी विकासकामाबाबत ज्या मागण्या केल्या. त्यावर मी तात्काळ निर्णय घेतले. स्वपक्षातील आमदारांपेक्षा जास्त विकास निधी काँग्रेसच्या आमदारांना दिला. भविष्यात काँग्रेससोबतीने कधीही सरकार स्थापन न करण्याचा निर्णय पक्षातील नेत्यांनी घेतला आहे, असेही कुमारस्वामी म्हणाले.