Kunal Kamra on CEC Gyanesh Kumar: बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून दुपारपर्यंत एनडीएने मोठी आघाडी घेतल्याचे चित्र दिसले. यामुळे एनडीएच्या समर्थकांमध्ये जोरदार उत्साह दिसत आहे. दुसरीकडे महाआघाडीचे पानीपत झाल्याचे दिसले. महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार तेजस्वी यादवही दुपारी तीन वाजेपर्यंत पिछाडीवर होते. यानंतर विरोधी पक्षांनी आणि इतरांनी निवडणूक आयोगाला बोल लावले आहे. प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरानेही निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका केली आहे.
कुणार कामरा यांनी एक्सवर एक पोस्ट टाकली आहे. त्यात ते म्हणाले, “ज्ञानेश कुमार यांना नेपाळला पाठवा. तिथेही भाजपाचे सरकार स्थापन होईल.” दोन ओळींच्या या पोस्टमधून कुणाल कामराने आजच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. यातून निवडणूक आयोगावर कुणाल कामराने जळजळीत टीका केल्याचे दिसत आहे.
दोन वाजता केलेल्या या पोस्टला अल्पावधीतच दोन लाख व्ह्यूज मिळाले आहेत. तर १८०० हून अधिक लोकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत.
कुणाल कामराप्रमाणेच आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनीही निवडणूक आयोगावर टीका केली आहे. ते म्हणाले, तीन महिन्यांपूर्वीच मी म्हणालो होतो की, ही निवडणूक भाजपाने पळवली आहे. आज केवळ ज्ञानेश कुमार यांनी विजयाचे प्रमाणपत्र पंतप्रधान मोदींना दिले आहे. ८० लाख मतदार ज्या राज्यातून वगळले आहेत, ५ लाख दुबार मतदार आहेत, त्या राज्यातील निकाल काय असतील? याचा विचार केला पाहिजे.
ज्ञानेश कुमार यांना मिठाई चारावी
भाजपाने आता निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे तोंड गोड केले पाहिजे, अशीही टीका संजय सिंह यांनी केली.
ज्ञानेश कुमार यशस्वी झाले
काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनीही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, सुरुवातीच्या ट्रेंडमधून असे दिसून येते की, ज्ञानेश कुमार यशस्वी होताना दिसत आहेत. ही लढाई भाजपा, काँग्रेस, राजद आणि जेडीयू यांच्यात नाही. तर ही थेट ज्ञानेश कुमार आणि भारतातील लोकांमधील लढाई आहे.
सोशल मीडियावरही टीका
सोशल मीडियावरही ज्ञानेश कुमार यांना लक्ष्य करणारे अनेक मिम्स व्हायरल होत आहेत.
