प्राप्तिकर खात्याचे २२ ठिकाणी छापे; चारा घोटाळ्यानंतर प्रथमच जाळ्यात

सुमारे एक हजार कोटींची बेनामी मालमत्ता जमविल्याप्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्याशी संबंधित दिल्ली, गुरुग्राम आणि हरयाणातील रेवाडी आदी २२ ठिकाणी प्राप्तिकर खात्याने मंगळवारी छापे घातले. लालूंचे पुत्र व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, कन्या व राज्यसभा खासदार मिसा भारती यांच्या नावाने हे व्यवहार असल्याचे समजते. चारा घोटाळ्यानंतर लालूंना नव्याने घेरणारी ही पहिलीच कारवाई आहे.

केवळ १.४१ कोटी रुपयांच्या मोबदल्यात दिल्लीतील उच्चभ्रू परिसरामध्ये सुमारे शंभर कोटी रुपयांची मालमत्ता मिसा भारती यांच्या नावावर असल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले. त्याबरोबर बिहारमधील सर्वाधिक मोठा मॉल असलेल्या पाटण्यात साडेसात लाख चौरस फुटांच्या मॉलची खरी मालकी लालूंच्या कुटुंबाकडेच असल्याचे प्रकरण भाजप नेते सुशीलकुमार मोदींनी खणून काढले होते. त्या पाश्र्वभूमीवर प्राप्तिकर खात्याने मंगळवारी छापासत्र सुरू केले. शंभरहून अधिक अधिकारी त्यात सहभागी झाले होते, असे समजते.

‘‘लालूंशी संबंधित असणाऱ्या आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संशयास्पद पद्धतीचे जमीन व्यवहार करणाऱ्या व्यक्ती आणि उद्योगपतींवर छापे घातले आहेत. या बेनामी मालमत्तांची किंमत एक हजार कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. याशिवाय त्यावरील करचोरी वेगळीच आहे,’’ असे प्राप्तिकर अधिकाऱ्याने सांगितले.

या छाप्यांनी लालूंची डोकेदुखी आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. कुख्यात गुंड महंमद शहाबुद्दीनने त्यांच्याशी तुरुंगातून केलेल्या संभाषणाची टेप एका वृत्तवाहिनीने नुकतीच दाखविली होती. त्यापाठोपाठ कन्या मिसा भारतीच्या बेनामी संपत्तीचे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर चारा घोटाळ्यातील सर्व खटले एकत्रित चालविण्याऐवजी स्वतंत्रपणे चालविण्याचा दणका देणारा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. शिवाय त्यांचे पुत्र, बिहारमधील मंत्री तेजप्रताप यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे नानाविध आरोप होत आहेत.

नेमके प्रकरण काय?

* लालूंची कन्या आणि राज्यसभा खासदार मिसा भारती व त्यांच्या पतीने केवळ एक कोटी ४१ लाख रुपयांच्या मोबदल्यात बोगस कंपन्यांच्या माध्यमातून दिल्लीतील ‘सनिक फॉम्र्स’ व बिजनवासन या उच्चभ्रूंच्या परिसरामध्ये सुमारे शंभर कोटींची मालमत्ता घेतल्याचा संशय

* तत्कालीन मनमोहन सिंग सरकारमध्ये मंत्री करण्यासाठी रघुनाथ झा आणि कांती सिंह या दोघांकडून त्यांच्या जमिनी लालूंनी स्वतच्या नावावर करून घेतल्याचा आरोप. तशी कागदपत्रे उघड

* ‘एके इन्फोसिस्टिम्स’ या कंपनीने २००७ मध्ये पाटण्यामध्ये जमिनी खरेदी केल्या. पुढे २०१४ मध्ये लालूंची पत्नी राबडी देवी, पुत्र व उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी त्या कंपनीचे सर्व समभाग आणि पर्यायाने कंपनीच विकत घेतली. याही व्यवहारामध्ये लालूंच्या कुटुंबीयांना कोटय़वधींचा फायदा झाल्याचा आरोप आहे.

लालूंचा आवाज दाबण्याची हिंमत भाजपच्या गिधाडांमध्ये नाही. हा लालू झुकणारा आणि घाबरणारा नाही. मला हात लावण्यापूर्वी त्यांनी आरशात स्वतचे तोंड पाहावे. एका लालूला चिरडल्यास बिहारमधून लाखो लालू उभे राहतील.

– लालूप्रसाद यादव

लालूंचे राजकारण हे फक्त लुटीचे राजकारण आहे. आधी चारा घोटाळा केला आणि आता बेनामी मालमत्तांमधून कोटय़वधींची लूट केली. लालूंच्या या बेनामी मालमत्ता नुकत्याच केलेल्या विशेष कायद्यान्वये जप्त करण्याची हिंमत नितीशकुमारांनी दाखवावी. 

– रविशंकर प्रसाद, केंद्रीय मंत्री