तुम्ही तुमच्या आधार कार्डला लॅमिनेशन केले असेल किंवा प्लास्टिक कोटिंग लावले असेल तर त्या आधारला काहीही अर्थ उरणार नाही ते बिनकामाचे ठरणार आहे असे आता UIDAI ने स्पष्ट केले आहे. लॅमिनेशन केल्याने किंवा प्लास्टिक कोटिंगमुळे आधार कार्डचा क्यू आर कोड काम करणे बंद होऊ शकते, किंवा यामुळे खासगी माहिती चोरली जाऊ शकते अशी शक्यता आहे. त्यामुळेच हा निर्णय UIDAI ने घेतला आहे. आधार कार्ड ही प्रत्येक भारतीयासाठी अनिवार्य असणारी ओळख आहे. मात्र या आधार कार्डला प्लास्टिक कोटिंग किंवा लॅमिनेशन केले असेल तर ते बिनकामाचे ठरणार आहे.

प्लास्टिक किंवा लॅमिनेशन केलेल्या आधार कार्डचा काहीही उपयोग नाही. कागदावर छापण्यात आलेलेच आधार कार्ड योग्य आहे असे UIDAI चे सीईओ अजय भूषण पांडे यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर काही लोक प्लास्टिक कोटेड आधार कार्ड देण्याच्या नावाखाली लोकांकडून ५० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत पैसे उकळत आहेत असेही पांडे यांनी म्हटले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले ट्विट केले आहे

तुमचे आधार कार्ड जेव्हा तुम्ही लॅमिनेशन किंवा प्लास्टिक कोटिंगसाठी देता तेव्हा तुमच्या आधार कार्डवर असलेल्या क्यू आर कोडचा गैरवापर केला जातो पण तुमच्या लक्षातही येत नाही. क्यू आर कोडद्वारे तुमची खासगी माहिती सार्वजनिक होते. आधार कार्ड चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आले तर तो एक गुन्हा आहे आणि कायद्यात त्यासाठी शिक्षा किंवा दंड भरण्याचीही तरतूद आहे असेही पांडे यांनी स्पष्ट केले आहे.