दिल्लीतील सामुहिक बलात्कारप्रकरणानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली असून आरोपींना जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी देशभरातून होत आहे.
 या घटनेचे तीव्र पडसाद संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले. राज्यसभेत भाजपचे व्यंकय्या नायडू यांच्यासह सपा, तृणमूल कॉंग्रेस, डिएमके आदी पक्षांच्या सदस्यांनी बलात्काराच्या गुन्ह्य़ात दोषींना जास्तीत जास्त कडक शिक्षेची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी केली.
यापाश्र्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री सुशिल कुमार शिंदे यांनी सांगितले की, लैंगिक गुन्ह्य़ांमध्ये आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी गुन्हे कायद्यात सुधारणा करण्याबाबतचे विधेयक लोकसभेत मांडण्यात आले आहे. या विधेयकांमध्ये बलात्कारासारख्या गुन्ह्य़ात दोषींना जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
राजधानीत तीव्र निदर्शने
नवी दिल्ली : चालत्या बसमध्ये निमवैद्यकीय विद्यार्थिनीवर झालेला सामूहिक बलात्कार आणि महिलांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचाराला पायबंद घालण्यात सरकारला आलेले अपयश यांच्या निषेधार्थ दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आणि पोलीस मुख्यालयासह राजधानीच्या विविध भागांत अ. भा. विद्यार्थी संघटना, अ. भा. लोकशाही महिला संघटना आणि अन्य संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी तीव्र निदर्शने केली. दिल्ली भाजपच्या वतीने जंतरमंतर येथे निदर्शने करण्यात आली. बलात्कारित युवतीची सोनिया गांधी यांच्याकडून विचारपूस
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी सफदरजंग रुग्णालयात जाऊन, सामूहिक बलात्काराला बळी पडलेल्या २३ वर्षीय युवतीची विचारपूस केली. अशा प्रकारच्या कृत्यांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शक्य त्या सर्व उपाययोजना आखण्याचे आदेश सोनिया गांधी यांनी सरकारला दिले.
ही तर लाजिरवाणी बाब – पंतप्रधान
दिल्लीतील सामूहिक बलात्काराची घटना ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली आहे. अशा प्रकारांची पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आदेश पंतप्रधानांनी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना दिले आहेत. माहिला खासदारांच्या एका शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेतली तेव्हा त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.
प्राणी तरी बरे- अमिताभ संतापले
मुंबई : दिल्लीतील बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. त्याचे पडसाद बॉलिवूडवरही उमटले. महानायक अमिताभ बच्चन यांनी तर या घटनेबद्दल ट्विटरवर सात्विक संताप व्यक्त करताना प्राणीही अशा प्रकारचे कृत्य करत नसल्याचे स्पष्ट केले आहे. बलात्काऱ्यांना कठोर शिक्षाच झाली पाहिजे असेही त्यांनी मत व्यक्त केले आहे.