पीटीआय, नवी दिल्ली
मतदार याद्या अधिकाधिक अद्यायावत असाव्यात, यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता मृत्यूंची माहिती थेट महानिबंधकांकडून घेतली जाणार आहे. याखेरीज मतदान प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठीही निर्णय घेण्यात आले आहेत.
मृत व्यक्तीच्या नावे बनावट मतदान झाल्याच्या तक्रारी अनेकदा केल्या जातात. यावर मार्ग काढत निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला. आता महानिबंधकांकडून मृत नागरिकांची यादी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मागवली जाईल आणि त्यानंतर बूथ स्तरावरील अधिकारी मतदाराच्या पत्त्यावर प्रतिनिधी पाठवून त्याची खातरजमा करतील व मतदार यादीतून नाव वगळले जाईल, असे आयोगाने सांगितले.
सुलभ प्रक्रियेवर भर
मृत मतदारांची यादी मिळविण्याबरोबर निवडणूक आयोगाने आणखी दोन निर्णय घेतले. मतदार चिठ्ठीवर यापुढे मतदार क्रमांक, मतदान केंद्र याची माहिती अधिक मोठ्या अक्षरात छापली जाणार आहे. तसेच मतदार आणि आयोगामधील महत्त्वाचा दुवा असलेल्या बूथ अधिकाऱ्यांना वेगळ्या प्रकारची ओळखपत्रे देण्यात येणार आहेत.