लंडन : आर्थिक आघाडीवरील अपयशामुळे टीकेच्या धनी ठरलेल्या ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी अखेर राजीनामा दिला. हुजूर पक्षातील वाढत्या नाराजीमुळे त्यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला होता. अवघ्या ४५ दिवसांतच त्यांना पायउतार व्हावे लागले असून ही ब्रिटनच्या इतिहासातील सर्वात छोटी कारकीर्द ठरली आहे.

हेही वाचा – अग्रलेख : आज की उद्या?

ट्रस यांनी सत्तेत येताच केलेल्या करकपातीच्या घोषणेनंतर ब्रिटनची अर्थव्यवस्था हादरली होती. त्यामुळे त्यांना आधी अर्थमंत्री क्वासी क्वारतेंग यांची हकालपट्टी करावी लागली. नवे अर्थमंत्री जेरेमी हंट यांनी ट्रस यांचे सर्व निर्णय केराच्या टोपलीत टाकले. तेव्हाच ट्रस यांची कारकीर्द अल्पजीवी ठरणार, हे स्पष्ट झाले होते. त्यातच बुधवारी गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनीही ट्रस यांच्यावर टीका करत राजीनामा दिला.

हेही वाचा – अग्रलेख : ट्रस ‘ट्रसल्या’!

गुरुवारी हुजूर पक्षातील सर्वात ज्येष्ठ पार्लमेंट सदस्य सर ग्रॅहम ब्रँडी यांनी अचानक त्यांची भेट घेतली. ब्रँड हे पक्षाच्या ‘१९२२ बॅकबेंचर्स कमिटी’चे अध्यक्षही आहेत. या भेटीत नेमके काय झाले, हे बाहेर आले नसले तरी त्यांनी ट्रस यांना स्वत:हून राजीनामा देण्याचा अखेरचा इशारा दिला असावा, असे मानले जात आहे. त्यानंतर १० डाऊिनग स्ट्रीट या पंतप्रधान निवासस्थानाबाहेर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ट्रस यांनी पंतप्रधान आणि पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.

हेही वाचा – अग्रलेख : ‘ट्रसट्रसती’ जखम!

येत्या आठवडाभरात पुन्हा पक्षांतर्गत निवडणूक होऊन नवा नेता निवडला जाईल. तोपर्यंत आपण हंगामी पंतप्रधानपदी राहणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

मध्यावधी निवडणुकीची मागणी

ब्रिटनमधील विरोधी मजूर पक्षाने मध्यावधी निवडणुकांची मागणी केली आहे. विरोधी पक्षाचे नेते सर कीर स्टार्मर यांनी हुजूर पक्षाने सत्तेत राहण्याचा जनाधार गमावला असल्याचा आरोप केला. हुजूर पक्षाने देशाला दयनीय अवस्थेत लोटल्याची टीकाही त्यांनी केली. अजून एका प्रयोगासाठी त्यांच्या पक्षाकडे जनमत नाही. आपल्या मनासारखे चालवण्यासाठी ब्रिटन त्यांच्या मालकीचे नाही, असा घणाङात सर स्टार्मर यांनी केला.

ऋषी सुनक नवे पंतप्रधान?

ट्रस यांनी शेवटच्या फेरीत पराभूत केलेले भारतीय वंशाचे नेते ऋषी सुनक हे आता पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. मात्र माजी पंतप्रधान बोरीस जॉन्सनदेखील पुन्हा पक्षांतर्गत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. अर्थात, त्यांना पक्षातून फारसा पाठिंबा मिळण्याची शक्यता नाही. याखेरीज पेन्नी मोरडाऊंट, सुएला ब्रेव्हरमन आणि संरक्षणमंत्री बेन वॉलेस हेदेखील पुन्हा स्पर्धेत उतरू शकतात.

हेही वाचा – अन्यथा : या मुलाखती इथे कशा?

जे आश्वासन देऊन मी निवडून आले होते, ते पूर्ण करता आले नाही. त्यामुळे मी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत आहे. राजे चार्ल्स यांना याबाबत माहिती दिली असून नवा पंतप्रधान निवडला जाईपर्यंत मी पद सांभाळणार आहे. 

लिझ ट्रस, मावळत्या पंतप्रधान, ब्रिटन