काँग्रेसने रविवारी लोकसभा निवडणुकीसाठी आपली नवीन घोषणा प्रसिद्ध केली आहे. ‘अब होगा न्याय’ ही घोषणा प्रसिद्ध करताना पक्षाने देशात ‘अन्यायाचे वातावरण’ असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा म्हणाले की,’ काँग्रेसची प्रचार मोहीम ही ‘न्याय’ भोवती केंद्रित असेल. हा शब्द केवळ पक्षाची प्रस्तावित किमान उत्पन्न हमी योजनाच रेखांकित करत नाही. तर समाजातील सर्व वर्गाला न्याय प्रदान करण्याबाबतही भाष्य करतो.
गरीबी पर वार होगा, सपना ये साकार होगा।
कांग्रेस सरकार में, सशक्त गरीब परिवार होगा।।#AbHogaNYAY pic.twitter.com/sBlf5ITnHY— Congress (@INCIndia) April 7, 2019
शर्मा पुढे म्हणाले की,’ जावेद अख्तर यांनी हे गाणे लिहिले असून निखिल अडवाणी यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. देशातील विविध भागात मोठमोठे कंटेनर ट्रकवर स्क्रीन लावून हा व्हिडिओ दाखवण्यात येणार आहे.’
काँग्रेसने या प्रचार गाण्यात शेतकरी, गरीब आणि युवकांचा उल्लेख केला आहे. तसेच शेतकरी समस्या, बेरोजगारीचे प्रमाण, नोटाबंदी, महिला सुरक्षा, जीएसटी आणि इतर बाबींकडे या गाण्यातून लक्ष वेधले आहे. लोकसभा निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यात काँग्रेसचे सर्वांत मोठे आश्वासन ‘न्याय’ची माहिती अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षाच्या युवक कार्यकर्त्यांनी घरोघरी माहिती पत्रके पाठवणे, कॉर्नर सभा घेण्यास सुरूवात केली आहे.
काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास देशातील सर्वांत गरीब पाच कोटी कुटुंबीयांना वार्षिक ७२ हजार रुपये देणार असल्याचे काँग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात म्हटले आहे. या योजनेला त्यांना न्याय असे नाव दिले आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने गाण्यातील काही ओळींवर आक्षेप नोंदवल्यानंतर प्रचार गाण्यात काँग्रेसने बदल केल्याचे सांगण्यात येते.