पुर्णिया/गया : पुन्हा सत्तेत आल्यास आमचे सरकार घुसखोर थांबवेल तसेच भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई सुरूच ठेवेल अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. मतपेढीच्या राजकारणामुळे घुसखोरी वाढल्याचा आरोप त्यांनी केला.

बिहारमधील पुर्णिया येथील सभेत घुसखोरांचा मुद्दा पंतप्रधानांनी उपस्थित केला. नेपाळ तसेच बांगलादेश सीमेनजीक हा मतदारसंघ आहे. मोदींना कोणी रोखू शकणार नाही हे सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणाऱ्यांनी ध्यानात घ्यावे असा इशाराच त्यांनी दिला. गया येथील सभेत त्यांनी राज्यघटनेचा संदर्भ देत वंचितांच्या वेदना मला समजतात. घटनेमुळेच माझ्यासारखी व्यक्ती पंतप्रधान होऊ शकली असे मोदींनी नमूद केले.

राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी भाजपला घटना बदलायची आहे असा आरोप केला होता. त्याला अप्रत्यक्षपणे पंतप्रधानांनी उत्तर दिले. राष्ट्रीय जनता दलावर त्यांनी टीका केली. पुर्णियातील सभेला मुख्यमंत्री नितीशकुमार उपस्थित नव्हते. विशेष म्हणजे संतोष कुशवा या त्यांच्याच पक्षाच्या उमेवारासाठी ही सभा झाली.

घुसखोरांना तृणमूलचे संरक्षण

बालूरघाट: सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करत, तृणमूल काँग्रेस घुसखोरांना संरक्षण देऊ पाहात आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. राज्यात तृणमूल काँग्रेसने गुंडांना मोकळे रान दिल्याची टीका पंतप्रधानांनी येथील सभेत केली. राज्यात रामनवमी उत्सवाला तृणमूल सरकार विरोध करते. कोलकाता उच्च न्यायालयाने हावडा येथे विश्व हिंदू परिषदेच्या मिरवणुकीला परवानगी देण्याचा निर्णय सत्याचा विजय असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. संदेशखालीचा मुद्दा उपस्थित करत, गुन्हेगारांना तृणमूल काँग्रेसने कसे संरक्षण दिले? हे देशाने पाहिले आहे. भ्रष्टाचार, गुन्हेगारी राज्यात फोफावल्याची टीका पंतप्रधानांनी केली.