दर १२ वर्षांनी भरणा-या कुंभमेळ्याला आज प्रयाग येथे सुरूवात झाली. जेव्हा समुद्रमंथन झाले तेव्हा त्यातून अमृत कलश निघाले. हे अमृत प्राशन करण्याकरिता राक्षसांनी प्रयत्न सुरू केले होते. तेव्हा देवांनी हा कलश उज्जन, प्रयाग (अलाहाबाद), नाशिक, हरिद्वार येथे क्रमाक्रमाने लपविला होता. अलाहाबाद येथे हा कलश असल्याचे माहीत पडताच राक्षसांचा मोर्चा येथे पोहोचला. राक्षस येत असल्याचे माहीत होताच तेथील कलश हरिद्वार येथे लपविण्यात आला. अशा प्रकारे या चारही तीर्थक्षेत्रावर दर १२ वर्षांने कुंभमेळय़ाचे आयोजन केले जाते, असे चतुर्थ संप्रदायाचे अध्यक्ष महंत रामलखनदास महाराज यांनी सांगितले.या मेळाव्यात तीन शाहीस्नान होणार आहे. त्यातील पहिले स्नान आज (सोमवार) १४ जानेवारी मकरसंक्रातीला पार पडत आहे. हर गंगे आणि हर हर महादेवच्या घोषणांनी कुंभमेळ्यातील पहिल्या शाहीस्नानाला सुरवात झाली. पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी आखाड्यांतील साधू-संतांनी संगम घाटाकडे कूच केले. सकाळी नऊपर्यंत ३० लाख भाविकांनी शाही स्नान केल्याचा अंदाज आहे. आज (सोमवार) सुमारे ८० लाख भाविक संगम आणि इतर घाटांवर स्नान करतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दुसरे स्नान १२ फेब्रुवारी मौनी अमावस्येला व तिसरे शाहीस्नान १५ फेब्रुवारी वसंतपंचमीला होईल.देशभरातून साधू-संतांसह दहा कोटी भाविक या मेळ्याला उपस्थिती लावतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुमारे पाच हजार एकर जागेमध्ये कुंभमेळा भरवला गेला आहे. ५५ दिवस चालणाऱ्या या कुंभ मेळ्याव्यासाठी उतत्र प्रदेश सरकारने मोठी जय्यत तयारी केली असून कुठलाही अनूचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्य़ा प्रमाणात बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.