थायलंडमध्ये गुहेमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी जगभरातून मदतीचा हात पुढे आला. यामध्ये महाराष्ट्राचीही भर पडली असून किर्लोस्कर कंपनीमध्ये इंजिनीअर असलेले प्रसाद कुलकर्णी थायलंडला रवाना झाले. डिझाईन हेड असलेले व पाण्याचा उपसा करणाऱ्या पंपांमध्ये तज्ज्ञ असलेले प्रसाद गुहेमध्ये विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी अडसर ठरलेले पाणी काढण्यासाठी थायलंड सरकारला मदत करत होते. आज मंगळवारी गुहेमध्ये राहिलेल्या शेवटच्या पाच जणांनाही सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले असून ही मोहीन फत्ते झाली आहे.
All 12 boys and the coach rescued from Thailand cave: The Straits Times #ThailandCaveRescue pic.twitter.com/d4b4VJ7LLK
— ANI (@ANI) July 10, 2018
प्रसाद यांचे बंधू किशोर कुलकर्णी यांनी लोकसत्ता डॉट कॉमशी बोलताना सांगितले की, प्रसाद किर्लोस्कर कंपनीत इंजिनीअर असून प्रतिकूल परिस्थितीमध्ये पंपांचं काम कसं करावं, मुलभूत सोयी नसताना पंप वापरायचे असतील तर काय करायला हवं आदी तांत्रिक बाबींमधले ते तज्ज्ञ आहेत.
थायलंडमधे एका दुर्गम व सुमारे दहा किमी लांबी असलेल्या गुहेत बारा मुले व त्यांचा फुटबॉलचा प्रशिक्षक अपघाताने 23 जूनपासून अडकले होते. हे 13 जण बेपत्ता झाले होते, परंतु बाहेर आढळलेल्या सायकलींवरून ते आत अडकल्याचे समजले. नंतर ते सगळे जिवंत असल्याचे व अचानक आलेल्या नदीच्या पुरामुळे ते गुहेत अडकल्याचे निष्पन्न झाले. थायलंड सरकारने लगेचच आपत्कालीन यंत्रणा कामाला लावली व मदतकार्य सुरू केले. दुर्दैवानं एका माजी सील कमांडोला आपला जीव गमवावा लागला आहे. सोमवारपर्यंत आठ जणांना बाहेर काढण्यात यश आले तर पाच जणांना आज मंगळवारी बाहेर काढण्यामध्ये यश आले आहे. आतमध्ये पुरेसा ऑक्सिजन व खाद्यपदार्थ पोचवण्यात आले होते त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका नव्हता. पुरामुळे फुगलेली नदी व तिच्या पाण्याचे प्रवाह हीच एक अडचण होती व तिच्यावर मात करणं सगळ्यात महत्त्वाचं ठरलं. महाराष्ट्रामधील मिरजेतील किर्लोस्कर ब्रदर्सचे प्रसाद कुलकर्णी व त्यांचा सहकारी यांनी मोलाची भूमिका बजावली असून बाकिच्या पाच जणांनाही सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळालं आहे.
किर्लोस्कर ब्रदर्सची थायलंडमध्येही शाखा असून त्यांनी सहकार्याचा हात पुढे केला होता. थायलंड सरकारनेही आभार मानत भारत सरकारला विनंती करून किर्लोस्कर ब्रदर्सचे (केबीएल) फ्लडपंप्स पाठवण्यास सांगितले. भारत सरकारने व केबीएलने युद्ध पातळीवर हालचाल करून त्यांचे डिझाईन प्रमुख व मिरजेचे प्रसाद कुलकर्णी यांची टीम तातडीने शुक्रवारी रात्री थायलंडला रवाना केली. थायलंडला पोहोचताच या टीमने लगोलाग कामास सुरूवात केली आणि फ्लड पंप्स सुरू केले. पाणी उपसा झाल्याचा सुखद परीणाम असा झाला की रविवारी चार मुलांची तर सोमवारी आणखी चार मुलांची गुहेतून सुखरूप सुटका झाली असे किशोर कुलकर्णी यांनी सांगितले.
स्ट्रेट्स टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार उर्वरीत विद्यार्थ्यांनाही मंगळवारी बाहेर काढण्यात आले असून 12 विद्यार्थी व त्यांचे प्रशिक्षक आता गुहेबाहेर आले आहेत.