राष्ट्रपित्यांच्या खासगी सचिवांचा खुलासा

राष्ट्रपिता म. गांधीजींची ७० वर्षांपूर्वी हत्या करण्यात आली तेव्हा त्यांनी ‘हे राम’ असे शब्द उच्चारलेच नव्हते, असे वक्तव्य करून दशकापूर्वी देशांत खळबळ माजविणारे गांधीजींचे खासगी सचिव व्ही. कल्याणम यांनी यापूर्वी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला आहे.

कल्याणम हे १९४३ ते १९४८ या कालावधीत गांधीजींचे खासगी सचिव होते. गांधीजींनी ‘हे राम’ म्हटलेच नाही असे वक्तव्य आपण कधीही केले नाही. गांधीजींना ‘हे राम’ असे म्हणताना आपण ऐकले नाही, असे आपण वक्तव्य केले होते. कदाचित म. गांधीजींनी ‘हे राम’ म्हटलेही असेल, आपण त्याबाबत अनभिज्ञ आहोत, असे कल्याणम यांनी स्पष्ट केले. गांधीहत्येचे साक्षीदार असलेले ९६ वर्षीय कल्याणम म्हणाले की, गांधीजींच्या हत्येनंतर घटनास्थळी ज्या पद्धतीचे वातावरण निर्माण झाले होते त्या गदारोळांत आपल्याला काहीही ऐकू आले नाही. गांधीजींवर गोळ्या झाडण्यात आल्या तेव्हा प्रत्येक जण ओरडत होता, त्या गदारोळांत आपल्याला काहीही ऐकू आले नाही. कदाचित गांधीजी ‘हे राम’ म्हणाले असतीलही, आपण त्याबाबत अनभिज्ञ आहोत, असे कल्याणम म्हणाले. गांधीजी गोळ्या लागून खाली कोसळले तेव्हा ते ‘हे राम’ म्हणालेच नाहीत, असे वक्तव्य कल्याणम यांनी कोल्लम येथे २००६ मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितल्याने देशांत खळबळ माजली होती. गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी त्या वक्तव्याचे खंडन केले होते.