Maithili Thakur Election News : संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने जोरदार मुसंडी मारली. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा सत्ताधारी आघाडीने चांगली कामगिरी करीत २४३ पैकी १८० हून अधिक जागांवर आघाडी मिळवली. या निवडणुकीत भाजपाच्या २५ वर्षीय उमेदवार मैथिली ठाकूर चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. अलीनगर मतदारसंघातून विजयी आघाडी घेतल्यानंतर त्यांनी एनआय वृत्तसंस्थेशी संवाद साधला. हा विजय आपल्यासाठी एक स्वप्नासारखा असल्याचे मैथिली यांनी म्हटले आहे.
मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीवरून पक्षातूनच नाराजी व्यक्त करण्यात आली होती. काहींनी त्यांच्या उमेदवारीला जोरदार विरोधही केला. तरीदेखील भाजपाने त्यांना अलीनगर विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच मैथिली यांनी आघाडी घेतल्याचे पाहायला मिळाले. यादरम्यान निवडणुकीत विजय मिळवल्यास तुम्ही आमदार म्हणून पहिला निर्णय काय घेणार असा प्रश्न मैथिली यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, ‘आमदार म्हणून हा माझा पहिला कार्यकाळ असेल. मी माझ्या मतदारसंघातील लोकांची मुलगी म्हणून सेवा करेन. मला खूप आनंद आहे की लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे. हा फक्त माझा विजय नसून जनतेचा विजय आहे, असं मैथिली यांनी म्हटलं आहे.
‘गायनाचा छंद सोडणार नाही’
“बऱ्याचदा सरकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत नाही आणि त्यामागे वेगवेगळी कारणे असतात. या योजनांना मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करेन. निवडणुकीच्या प्रचारावेळी मला अलीनगर मतदारसंघात बऱ्याच समस्या दिसून आल्या होत्या. त्याची मी डायरीत नोंद करून ठेवली असून लवकरात लवकर या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन. पुढील पाच वर्षांत मी माझ्या मतदारसंघाचा विकासाच्या माध्यमातून कायपालट करणार आहे. राजकारणात प्रवेश केला असला तरी मी माझा गायनाचा छंद सोडणार नाही. त्यासाठी मी दररोज एक तास लवकर उठेन आणि रात्री उशिरा झोपणार, असेही मैथिली यांनी स्पष्ट केले आहे.
कोण आहेत मैथिली ठाकूर?
मैथिली ठाकूर यांचा जन्म बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील बेनीपट्टी इथे झाला. त्यांचे वडील रमेश ठाकूर हे स्वतः संगीत शिक्षक आहेत आणि त्यांनी तिला लहानपणापासूनच लोक संगीत आणि शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षण दिलं. घरातील वातावरण संगीतमय असल्यामुळे मैथिली यांना लहानपणापासूनच संगीताची गोडी लागली. त्यांचे दोन भाऊ, ऋषव आणि अयाची, तबला आणि हार्मोनियम वाजवतात. आधी ही तिनही भावंड एकत्र आपल्या राहत्या घरीच व्हिडीओ रेकॉर्ड करुन तो यूट्यूबवर अपलोड करायचे. हळूहळू, या भावंडांच्या व्हिडीओंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आणि मैथिली ठाकूर आणि त्यांच्या भावंडाचं नाव घराघरात पोहोचलं आहे.
