अहमदाबाद | ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रम आणि ‘आत्मनिर्भर भारत’अंतर्गत हैदराबाद स्थित ‘मेघा इंजीनियरिंग अँड इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ (MEIL )ने निर्माण केलेली दुसरी स्वदेशी अत्याधूनिक तंत्रज्ञानावर आधारीत ‘ऑईल ड्रिलिंग रिग’ (तेल विहीर खोदणारी यंत्रणा) ‘ONGC’ कडे सुपुर्द केली. या नवीन ड्रिलिंग रिग मूळे ऑइल आणि गॅसच्या उत्पादनाचा वेग तर वाढतोच शिवाय अधिक सुरक्षित प्रणाली असल्याने खर्चात देखिल बचत होते. महत्वाचे म्हणजे या प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप अत्यंत मर्यादित असल्याने वैयक्तिक सुरक्षिततेला प्राधान्य मिळते. MEIL ने या वर्षाच्या सरूवातीला एप्रिलमध्ये ओएनजीसीकडे पहिली रिग सुपुर्द केली होती. जी सध्या अहमदाबादमधील मेहसाणा येथील कलोल तेल क्षेत्रात कार्यरत आहे.

‘ओएनजीसी’कडे सुपुर्द करण्यात आलेली १५०० एचपी क्षमतेची दुसरी रिग हाइड्रोलिक आणि सॉफ्टवेयर तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणेवर काम करत असल्याने या तंत्रज्ञानाच्या फायदा ओएनजीसीला मिळेल. ही रिग ओएनजीसीच्या अहमदाबादातल्या कलोलजवळ धमासणा गावात GGS- IV तेल क्षेत्रात कार्यरत होतेय. १५०० हॉर्स पॉवरची क्षमता असणारी ड्रिलिंग रिग जमिनीखाली ४ हजार मीटर (४ किलोमीटर) खोदकाम करु शकते. रिग ४० वर्षे कुठलाही तांत्रिक बिघाड न होता काम शकते आणि महत्वाचे म्हणजे ती दुसऱ्या ठिकाणी देखील तिला हलवले जाऊ शकते. अत्याधूनिक तंत्रज्ञानावर आधारीत सुरक्षा मानकाची पुर्तता करणारी ही रिग निश्चितच भारताच्या भविष्यकालिन गरजा पूर्ण करणारी आहे.

२०१९ मध्ये एमईआयएलला ६ हजार कोटी रुपयांचे ४७ ड्रिलिंग रिग्जचे उत्पादन करण्याचे टेंडर प्राप्त झाले आहे. यातील पहिली रिग अहमदाबादच्या तेल क्षेत्रात वापरली गेली. उर्वरित ४६ रिग्ज उत्पादनाच्या विविध टप्प्यात आहेत. एकूण रिग्जपैकी २० वर्क ओव्हर रिग्ज तर, २७ लँड ड्रिलिंग रिग्ज आहेत.

‘वर्क ओव्हर रिग्ज’चा उपयोग –

ओव्हर रिग्जचा उपयोग खोदलेल्या विहिरींमधून तेल काढण्यासाठी केला जातो, तसेच यामूळे तेल उत्पादनात वाढ होते. याशिवाय, तेल विहिरी दुरुस्त करण्यासाठी ह्या सोयीस्कर असतात. सामान्य रिग्ज हे काम करण्यास उपयुक्त नसतात. तर, २० वर्क ओव्हर रिग्जमध्ये ५० मेट्रीक टन क्षमतेच्या – १२, १०० मेट्रीक टन क्षमतेच्या – ०४ आणि १५० मेट्रीक टन क्षमतेच्या अन्य चार रिग्जचा समावेश आहे.

‘लँड ड्रिलिंग रिग्ज’ म्हणजे काय? –

लँड ड्रिलिंग रिग एक अत्याधुनिक मशीन आहे जे भूगर्भाच्या पृष्ठभागापासून भूमिगत तेलाच्या साठ्यापर्यंत पृथ्वीचे थर खोदते. ते साधारण १५०० मीटर ते ६ हजार मीटरपर्यंत आत जाऊ शकते. साधारण रिग्ज केवळ १००० मीटर पर्यंत खोदू शकतात. तर, लँड ड्रिलिंग रिग्ज पैकी दोन १५०० एचपी क्षमतेच्या मोबाइल हायड्रोलिक रिग्ज आहेत आणि १७ एसी VFD रिग्ज आहेत ज्यांची क्षमता १५०० एचपी, सहा अन्य AC VFD रिग्ज आहेत ज्यांची क्षमता दोन हजार एचपी आहे आणि दोन आणखी दन हजार एचपीच्या HT VFD रिग्ज आहेत. दोन हजार एचपीच्या रिग्ज ६ हजार मीटर पर्यंत खोदकाम करू शकतात.

परदेशी कंपनीच्या रिग्जच्या तोडीस तोड अशी स्वदेशी रिग्ज –

काही रिंग्ज आंध्र प्रदेशातील राजामुंद्रीच्या तेलक्षेत्रात उपयोगात येतील , तर उर्वरित आसाम, त्रिपुरा आणि तामिळनाडूमधील ओएनजीसी तेल उत्खनन क्षेत्रात उपयोगात आणल्या जातील. आतापर्यंत आपण यासाठी अन्य देशांच्या यंत्रणेवर अवलंबून होती. MEIL संपूर्ण भारतीय प्रगत तंत्रज्ञानासह रिगची निर्मिती करीत आहे जी इतर कोणत्याही परदेशी कंपनीच्या रिग्जच्या तोडीस तोड अशीच आहे.

प्रगत तंत्रज्ञानाने क्रुड ऑइल जमिनीतून काढण्यासाठी वापरल्या जाणार्‍या रिग्जची निर्मिती आणि वापर करणारी खासगी क्षेत्रातील मेघा इंजिनीअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (MEIL) ही भारतातील पहिली कंपनी आहे. केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया मोहिमेचा एक भाग म्हणून, एमईआयएलने देशात प्रथमच या रिग्जची निर्मिती केली आहे.

इंधन आयातीचे प्रमाण कमी झाले पाहिजे – पी. राजेश रेड्डी

मेघा इंजिनियरिंग अँड इंफ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (MEIL) उपाध्यक्ष पी. राजेश रेड्डी म्हणतात, “ मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या योजना यशस्वी करायच्या असतील तर इंधन आयातीचे प्रमाण कमी झाले पाहिजे. MEIL ने या क्षेत्रात आपला वाटा उचलाय. ” तर,  ‘एमआयआयएल’चे मुख्य अधिकारी (तेल उत्पादन रिग्ज डिव्हिजन) एन. कृष्णकुमार यांनी प्रोजेक्टची विस्तृत माहिती दिली आहे, “आतापर्यत भारत तेल उत्पादन करणाऱ्या रिग्ज आयात करत होता , परंतु MEIL ने देशांर्तग रिग बनवण्याची क्षमता वाढवत नेत तेल आणि गॅस उत्पादन रिग्ज स्वस्त, सोपे आणि सुरक्षित बनवल्या आहेत. हे तंत्रज्ञान आता तेल आणि गॅस उत्खनन अधिक वेगवान बनवते.” असं ते म्हणाले.

…या ‘ऑईल ड्रिलिंग रिग’ गॅसवर कार्यरत असल्याने खर्चात बचत –

याचबरोबर “मेघा इंजीनियरिंग अँड इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड (MEIL )ने निर्माण केलेल्या स्वदेशी अत्याधूनिक तंत्रज्ञानावर आधारीत ‘ऑईल ड्रिलिंग रिग्ज’ची वैशिट् म्हणजे त्या अतिशय़ अचूक, जलद व सुरक्षितपणे काम करतात. सध्या देशात प्रचलित असलेल्या रिग्ज या डिझेलवर कार्यरत आहेत, मात्र सध्या डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने यासाठीचा खर्च देखील वाढताना दिसतोय. तर, या अत्याधूनिक तंत्रज्ञानावर आधारीत ‘ऑईल ड्रिलिंग रिग्ज’ गॅसवर कार्यरत रहात असल्याने, ओएनजीसीच्या गॅसचा यासाठी वापर होतो आहे व यामुळे जवळपास ५० टक्के खर्च देखील वाचत आहे. आज देशात जवळपास ८० टक्के तेल आयात केले जाते तर २० टक्के उत्पादन देशात होते. या अत्याधुनिक रिग्जच्या निर्मितीमुळे देशांतर्गत उत्पादन वाढीस मदत होणार आहे. अहमदाबादच्या मेहसाणा येथील कलोल तेल क्षेत्रात कार्यरत असलेल्या रिग्जला १८०० मीटर खोलीवर तेल साठा लागला. तर, अन्य ठिकाणी तीन ते चार हजार मीटर पर्यंत देखील खोदकाम केले जाते.” अशी माहिती ‘मेघा इंजीनियरिंग अँड इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ ऑईल रिग्ज विभागाचे प्रमुख एन.के.कुमार यांनी दिली.