वृत्तसंस्था, नवी दिल्ली : भारतातील विविध १७ बँकांचे ९,००० कोटी रुपयांहून अधिक कर्ज थकविणाऱ्या विजय मल्याला न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी चार महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असून दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला. मल्याने २०१७ मध्ये एका खटल्यात न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करता मुलाला सुमारे ४ कोटी डॉलर हस्तांतरित केल्याची माहिती न्यायालयापासून लपवल्याचे उघड झाले आहे. तसेच वारंवार सुनावणीला अनुपस्थित राहणाऱ्या मल्याबाबत न्यायालयाने गंभीर दखल घेत माहिती दडवणे आणि न्यायालयाच्या अवमानप्रकरणी दोषी ठरवले आहे.

मल्याला येत्या चार आठवडय़ांच्या आत दंडाची रक्कम भरण्याचे आदेश देण्यात आले असून दंडाची रक्कम न भरल्यास तुरुंगवासाच्या शिक्षेत दोन महिन्यांची वाढ करण्यात येईल, असे न्यायमूर्ती उदय लळीत, एस रवींद्र भट आणि पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे. याचबरोबर न्यायालयाने ४ कोटी डॉलर व्याजासह चार आठवडय़ांत जमा करण्याचे आदेश मल्याला दिले आहेत. न्यायालयाने निश्चित केलेल्या मुदतीत पैसे न भरल्यास मालमत्ता जप्त करण्याचा इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विजय मल्याने तथ्य लपवून मुलगा सिद्धार्थ मल्या आणि मुलगी लियाना मल्या आणि तान्या मल्या यांच्याकडे निधी हस्तांतरित केल्याचा आरोप बँकांनी केला होता. गेल्यावर्षी ब्रिटनमधील न्यायालयाने भारतातून फरार झालेला उद्योगपती विजय मल्याला दिवाळखोर जाहीर केले आहे. तो मागील सहा वर्षांपासून लंडनमध्ये वास्तव्यात आहे. मल्ल्याने किंगफिशर एअरलाइन्ससाठी भारतीय बँकांकडून सुमारे ९,००० कोटींचे कर्ज घेतले होते.