मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाईलवरून व्हिडीओ शूट केल्याने आणि फोटो क्लिक केल्याच्या कारणावरून एका भारतीय लष्कराच्या जवानाने तरुणावर गोळी झाडली आहे. या घटनेत संबंधित तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार केले जात आहेत. या धक्कादायक प्रकारानंतर पोलिसांनी तातडीने आरोपी जवानाला बेड्या ठोकल्या आहेत. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित घटना रीवा जिल्ह्यातील मनगवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. आरोपी जवान सुट्टीसाठी आपल्या घरी आला होता. घटनेच्या दिवशी तो आपल्या एका मैत्रिणीबरोबर मंदिरात बसला होता. यावेळी गावातील एका तरुणाने या प्रेमी युगुलाचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर जवानाने तरुणाला संबंधित व्हिडीओ डिलीट करण्याचा आग्रह केला. पण तरुणाने व्हिडीओ डिलीट करण्यास नकार दिला. यामुळे वादाला सुरुवात झाली. हा वाद विकोपाला गेल्यानंतर रागाच्या भरात आरोपी जवानाने बंदूक काढून तरुणावर गोळी झाडली. यानंतर तो आपल्या प्रेयसीसह घटनास्थळावरून फरार झाला.

हेही वाचा- हृदयद्रावक: फिफा विश्वचषकाचा आनंद क्षणात विरला, मुंबईत पाचव्या मजल्यावरून पडून चिमुकल्याचा अंत

या घटनाक्रमानंतर आजूबाजूच्या लोकांनी जखमी युवक ब्रिजेंद्र कोरी याला संजय गांधी रुग्णालयात दाखल केले. तरुणाच्या डोक्यात गोळी लागली असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेची माहिती मिळताच मनगवा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीची ओळख पटवून अटक केली. आरोपी ब्रृजभूषण तिवारी लष्करी सेवेत पतियाळा येथे तैनात असून तो सुट्टीसाठी आपल्या गावी आला होता. आरोपीला अटक केली असून पुढील चौकशी केली जात आहे.