बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गुरूवारी केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. जनमताचा कौल हा विरोधकांना छळण्यासाठी नसल्याचे खडे बोल यावेळी त्यांनी भाजपला सुनावले. गेल्या काही दिवसांपासून नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून संसदेत काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपमध्ये खडाजंगी सुरू आहे. काँग्रेस संसदेत गोंधळ निर्माण करून संसदेचा वापर न्यायव्यवस्थेला धमकावण्यासाठी करीत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. मात्र, संसदेचे कामकाज सुरळीत चालवणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे सांगत नितीश यांनी भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
नॅशनल हेराल्ड प्रकरणात पंतप्रधान कार्यालय आमच्यावर शंभर टक्के राजकीय सूड उगवित असल्याचा आरोप काल काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. संसदेबाहेर त्यांनी वार्ताहरांना सांगितले होते की, हा शंभर टक्के पंतप्रधान कार्यालयाने उगवलेला राजकीय सूड आहे, मला न्यायव्यवस्थेबाबत आदर आहे. शेवटी काय घडते ते आम्ही पाहात आहोत. खरे सत्य लवकरच बाहेर येईल. काँग्रेस संसदेचा वापर न्याय व्यवस्थेला धमकावण्यासाठी करीत आहे, या संसदीय कामकाज मंत्री एम.व्यंकय्या नायडू यांचा आरोप फेटाळताना त्यांनी सांगितले की, ते उलटय़ा अर्थाने खरे आहे. न्यायव्यवस्थेला कोण धमकावत आहे, हे आपल्या सर्वानाच माहिती आहे.