माझ्या हयातीतच मंदिर तयार होईल. ते कसे आणि केव्हा तयार होईल, हे सांगू शकत नाही, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कोलकात्यातील एका कार्यक्रमात बुधवारी केले. मंदिर आपल्या डोळ्यांदेखतच तयार होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, राम मंदिर असा स्पष्ट उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केलेला नाही.
कार्यक्रमात आपले विचार मांडताना मोहन भागवत म्हणाले, मंदिराच्या उभारणीसाठी आपल्या सगळ्यांना तयार राहावे लागेल. त्यासाठी नियोजनही करून ठेवले पाहिजे. माझ्या हयातीतच मंदिर तयार केले जाईल. आपल्या डोळ्यांदेखतच मंदिराच्या उभारणीचे काम पूर्ण होईल. ते केव्हा आणि कसे होईल, हे आताच सांगू शकणार नाही. भारतीय संस्कृती सर्वांना सोबत घेऊन चालणारी आहे. आम्ही विविधतेत एकता पाहतो, असेही त्यांनी सांगितले.