देशातील विविध सुरक्षा दलांमध्ये कार्यरत असलेल्या जवानांमुळेच आपण उत्साहात दिवाळी साजरी करु शकतो असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांप्रती आदर व्यक्त केला आहे. दिवाळी हा अंधारातून प्रकाशाकडे नेणारा उत्सव असून हा उत्सव आता फक्त भारतातच नव्हे तर जगभरात साजरा होतो असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे देशवासीयांना संबोधित केले. दिवाळीच्या आधी घराघरात स्वच्छता अभियान राबवले जाते असे नरेंद्र मोदींनी सांगितले. दिवाळीचे महत्त्व अधोरेखित करत मोदी म्हणाले, आपल्या उत्सवामध्ये परंपरेला विज्ञानाची जोड आहे. प्रकाशाकडे नेणा-या उत्सवातून प्रेरणा मिळते. म्हणूनच आता जगभरात हा उत्सव साजरा केला जात आहे. अमेरिका, कॅनडा , ब्रिटन, सिंगापूरमधील दिवाळी साजरी केल्याचे दाखलेही त्यांनी दिले आहेत. दिवाळी निमित्त जवानांना संदेश देण्याच्या आवाहनाला भरभरुन प्रतिसाद देणा-या क्रीडापटू, अभिनेते आणि सर्व सामान्यांचे त्यांनी कौतुक केले.
सैन्य,सीमा सुरक्षा दल, सीआरपीएफ असे कोणतेही सुरक्ष दल असो या जवानांमुळेच आपण दिवाळी साजरी करु शकतो. यंदाची दिवाळी आपण त्यांना समर्पित करु असे आवाहन मोदींनी केले. आयुष्यातील प्रत्येक वळणावर हे जवान राष्ट्रहिताला प्राधान्य देतात असेही ते म्हणालेत. भारत तिबेट पोलीस दलातील विकास ठाकूर या जवानाचे मोदींनी भरभरुन कौतुक केले. हिमाचल प्रदेशमध्ये राहणा-या विकास ठाकूर या जवानाने गावातील घराघरात शौचालय बांधण्यासाठी तब्बल ५७ हजार रुपये दिले होते. या सामाजिक बांधिलकीसाठी मोदींनी ठाकूरचे कौतुक केले आहे. ३१ ऑक्टोबररोजी सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभरात एकता दिवस साजरा केला जाणार आहे. तसेच इंदिरा गांधी यांच्या पूण्यतिथीनिमित्त त्यांनादेखील श्रद्धांजली अर्पण करु असे मोदींनी स्पष्ट केले. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर सरदार यांच्या जन्मदिनीच सरदारांवर (शीखांवर) अत्याचार झाले हे दुर्दैवी आहे. पण आपण आता एकतेचे दर्शन घडवले पाहिजे. विविधतेत एकता ही भारताची शक्ती आहे असेही त्यांनी सांगितले.